शेतकरी बंधू मोठ्या कष्टाने रक्ताचे पाणी करून, काबाडकष्टाने सोन्यासारखा शेतीमाल पिकवतात. त्यानंतर मात्र शेतकऱ्यांकडे दोन पर्याय असतात व त्यातील पहिला म्हणजे जोपर्यंत चांगला दर मिळत नाही तोपर्यंत घरामध्ये तो शेतीमाल साठवून ठेवणे व दुसरा म्हणजे बाजारपेठेत जे बाजार भाव असतील त्या बाजारभावात शेतीमाल विकणे हे होय.
या दोन्ही प्रकारांमध्ये शेतकऱ्यांचे बऱ्याचदा नुकसान होताना आपल्याला दिसून येते. कारण जर शेतीमाल घरामध्ये साठवून ठेवला तर बऱ्याचदा मालाची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते.तसेच उंदीर किंवा घुशीपासून नुकसान होण्याची देखील शक्यता असते.
दुसरे नुकसान म्हणजे बऱ्याचदा पिकांची काढणी एकाच वेळी होते व मोठ्या प्रमाणावर शेतीमाल विक्री करिता बाजारपेठेत येतो व बाजारभाव घसरतो. जर शेतीमाल साठवायला योग्य जागा नसेल तर शेतकऱ्यांना जो आहे त्या दरामध्ये शेतीमाल विकावा लागतो व मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. त्यामुळे या नुकसानी पासून वाचायचे असेल तर शेतीमाल साठवण्याकरिता वखार महामंडळाच्या गोदामांचा वापर करणे खूप फायद्याचे ठरू शकते.
शेतीमाल वखार महामंडळाच्या गोदामात साठवण्याचे फायदे
शेतकऱ्यांनी जर शेतीमाल घरात साठवण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामा मध्ये साठवला तर सगळ्यात त्याचा फायदा म्हणजे त्या ठिकाणी साठवलेल्या शेतीमालाला विमा संरक्षण मिळते. तसेच उंदीर किंवा इतर बुरशी व किड्यांपासून देखील धान्याचे संरक्षण होते. तसेच महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जे काही शेतीमाल गोदामामध्ये ठेवतात.त्यावर शासनाच्या माध्यमातून अत्यल्प असे मासिक भाडे आकारले जाते.
साधारणपणे एका पोत्यासाठी महिन्याला सात रुपये एवढा चार्ज आकारला जातो व यामध्ये 50% गोदाम भाड्यामध्ये सूट देखील मिळते. तसेच शेतकरी कंपनी असेल तर गोदामाच्या भाड्यात 25% सूट मिळू शकते व अशा पद्धतीची सूट पकडून जर आकडेवारी पाहिली तर पोत्याला महिन्याला चार ते पाच रुपये इतके भाडे शेतकऱ्याला द्यावे लागते.
म्हणजेच अगदी कमीत कमी खर्चात शेतीमालाचे चांगले संरक्षण संपूर्ण महिनाभर आपल्याला करता येते. तसेच वखार महामंडळाच्या माध्यमातून गोदाम आणि गोदामातील शेतीमालाला आग, चोरी व कर्मचाऱ्यांकडून गैरवापर या तीन कारणांकरिता विम्याचे संरक्षण देखील दिले जाते. तसेच आगीची घटना घडून शेतीमाल खराब होऊ नये याकरिता गोदामांमध्ये आगरोधक यंत्रणासुद्धा उपलब्ध करून दिलेली असते.
शेतीमालावर मिळू शकते तारण कर्ज
वखार महामंडळाच्या गोदामात शेतीमाल साठवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना अचानक पैशांची गरज पडली तर गोदामात ठेवलेल्या शेतीमालावर नऊ टक्के दराने तारण कर्ज देखील शेतकऱ्यांना मिळू शकतो. एवढेच नाही तर शेतीमाल गोदामात ठेवल्यानंतर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येणारी
वखार पावती किंवा गोदाम पावती कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तारण ठेवून त्यांच्याकडून सहा टक्के दराने तारण कर्ज देखील मिळते. तसेच महत्त्वाचा फायदा म्हणजे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या ज्या काही गोदामे आहेत ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच उभारलेली असतात. त्यामुळे शेतीमाल भविष्यात बाजारपेठेत विकणे देखील सोपे होते.