Onion Seed:- महाराष्ट्र मध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते व ती खरीप आणि लेट खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात कांदा लागवड होत असते. त्यामुळे साहजिकच कांद्याच्या माध्यमातून भरघोस उत्पादन मिळावे याकरता शेतकरी भरघोस उत्पादन देणाऱ्या वाणांच्या शोधामध्ये असतात.
कारण कुठल्याही पिकाचे वाण जर दर्जेदार उत्पादन देणाऱ्या असतील तर त्यापासून भरघोस असे उत्पादन मिळते व हीच बाब कांदा पिकाला देखील लागू होते. याकरिता शेतकऱ्यांना खरीप आणि लेट खरीप हंगामातील कांदा लागवडीकरिता दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे याकरिता 21 मे पासून महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत फुले समर्थ आणि फुले बसवंत या कांदा बियाण्याची विक्री केली जात आहे.
कांदा बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसून येत असून अवघ्या तीन दिवसांमध्ये साधारणपणे एक कोटी 35 लाख रुपयांची बियाण्याची विक्री करण्यात आलेली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून पंधराशे रुपये प्रति किलो या दराने हे बियाणे विक्री केले जात आहे. नेमकी शेतकऱ्यांची या बियाण्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी का दिसून येत आहे हा देखील एक मोठा प्रश्न आहे व त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
फुले समर्थ कांदा बियाण्याचे वैशिष्ट्ये
1- फुले समर्थ कांदा बियाण्याला ब्रिडर सीड म्हणून देखील ओळखले जाते. म्हणजेच शेतकऱ्यांनी एकदा या बियाण्याची लागवड केली की त्यापासून घरी स्वतःचे बियाणे शेतकऱ्यांना तयार करता येणे शक्य आहे.
2- या जातीच्या कांद्याचा रंग गडद
लाल आणि कापल्यावर एक रिंग असलेला हा कांदा असतो व त्याला सिंगल रिंग कांदा देखील म्हटले जाते.
3- विशेष म्हणजे या जातीच्या कांदा लागवडीतून जोड कांद्याचे उत्पादन शक्यतो येत नाही.
4- उत्पादित कांदा हा एकसारखा आकाराचा असतो व त्यामुळे बाजारपेठे देखील त्याला चांगली मागणी मिळते.
5- तसेच उत्पादनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर फुले समर्थ या कांद्याच्या वाणापासून खरीप हंगामात 280 क्विंटल प्रति हेक्टर तर रांगड्या किंवा लेट खरीप हंगामात 400 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत उत्पादन मिळते.
फुले बसवंत या कांदा वाणाची वैशिष्ट्ये
1- फुले बसवंत हा कांदा वाण खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी लागवडीस उपयुक्त आहे.
2- या वाणाच्या कांदा हा आकाराने मध्यम व मोठा व शेंड्याकडे निमुळते असतात.
3- रंगाने लाल गडद व काढल्यानंतर तीन ते चार महिने आरामात टिकतो.
4- उत्पादनाच्या बाबतीत बघितले तर हेक्टरी यापासून 250 ते 300 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
पोलीस बंदोबस्तात केली जात आहे विक्री
दरवर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कांद्याचे बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत असते. जास्तीची ही गर्दी टाळता यावी याकरिता विद्यापीठाच्या माध्यमातून विभागात दहा ठिकाणी कांदा बियाणे विक्री केंद्रांची व्यवस्था केली आहे. परंतु तरी देखील विद्यापीठांमध्ये शेतकरी रात्री मुक्काम ठोकून सकाळी बियाणे रांगेत उभे राहून खरेदी करण्याला प्राधान्य देतात.
विद्यापीठाच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांची राहण्याची सोय करण्यासाठी गेस्ट हाऊसची सुविधा देण्यात आलेली आहे व प्रत्यक्ष विक्रीच्या वेळेस गर्दी अनियंत्रित होऊ नये याकरिता यावर्षी देखील पोलिसांचा बंदोबस्त मागवावा लागल्याचे दिसून येत आहे.