Animal Care:- पशुपालन व्यवसायामध्ये ज्याप्रमाणे जनावरांच्या चारा आणि पाणी व्यवस्थापनाला महत्त्व आहे अगदी त्याच पद्धतीने आरोग्य व्यवस्थापनाला देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण दुभत्या जनावरांच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर आरोग्य व्यवस्थापनाचा सरळ परिणाम हा दूध उत्पादनावर होत असतो.
जर आरोग्य व्यवस्थापनामध्ये ढिसाळपणा झाला तर दुधाच्या उत्पादनात घट होऊन आर्थिक फटका बसू शकतो व एवढेच नाही तर कधीकधी जनावरे मृत्युमुखी पडून खूप मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. जनावरांच्या बाबतीत बघितले तर अनेक प्रकारांच्या आजारांचा प्रादुर्भाव जनावरांना होत असतो व त्यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते.
जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात व त्यामध्ये धनुर्वात हा आजार जनावरांसाठी जीवघेणा ठरू शकतो. धनुर्वात हा आजार चनावरे आणि मानवाच्या मज्जा तंतूंना जडणारा विशेष आणि जीवघेणा आजार असून तो टिटॅनस टॉक्सिन या विषाणूमुळे होतो. त्यामुळे जनावरांमध्ये जर हा आजार दिसून आला तर यावर वेळीच उपाययोजना करणे खूप गरजेचे आहे.
धनुर्वात आजाराची लागण कशी होऊ शकते?
समजा जनावरांना एखादी जखम झाली व या जखमेचा संपर्क जर धूळ किंवा माती सोबत आला किंवा एखादे गंजलेले लोखंड आहे व अशा वस्तू मुळे जर जखम झाली तरी या आजाराचा जिवाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. जर यामध्ये क्लॉस्ट्रीडिएम टेटानी या जिवाणूचा संसर्ग झाला तर या जिवाणूची वाढ होत असताना त्यादरम्यान टिटॅनस टॉक्सिन विष तयार करता व या विषाचा विपरीत परिणाम जनावरांच्या मज्जातंतूवर होऊन चेहरा व इतर स्नायू आखडले जातात.
साधा ओरखडा जरी पडला तरी त्यातून हे जिवाणू शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. या जिवाणूचे वैशिष्ट्य म्हणजे हा प्राणवायूच्या संपर्कामध्ये वाढू शकत नाही परंतु स्नायूंमधील प्राणवायू नसलेल्या वातावरणामध्ये मात्र यांची वाढ सहजपणे होते. जर आपण या आजाराचे संक्रमण पाहिले तर जे जनावरे यामुळे बाधित आहेत
अशा जनावरांच्या संपर्कातून, खाद्य, पाणी किंवा हवेतून होत नाही. प्राण्यांमध्ये गाय, कुत्रा आणि मांजर इत्यादी प्राण्यांना या आजाराला प्रतिकार करण्याची ताकद जास्त आहे. परंतु त्या तुलनेत मात्र शेळ्या तसेच घोडा व मेंढ्या तसेच मनुष्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता कमी आहे.
धनुर्वात आजाराची लक्षणे काय आहेत?
1- जर शरीरामध्ये या जिवाणू ने प्रवेश घेतला व संसर्ग झाला तर हा आजार होण्याचा कालावधी तीन ते 21 दिवसांचा असू शकतो.
2- या आजाराच्या जिवाणूंनी शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर तीन ते 14 दिवसांमध्ये या धनुर्वात आजाराची लक्षणे दिसायला लागतात.
3- तेव्हाच स्नायूंमध्ये या जिवाणूंची वाढ होत असते तेव्हा टेटॅनोस्पाझ्मीन हे घातक विष उत्सर्जित करत असतात व या विषाच्या प्रमाणानुसार जनावरांच्या प्रतिकार क्षमतेनुसार आजाराची तीव्रता ठरते.
4- या विषाचा परिणाम मेंदू, मज्जा संस्था तसेच पाठीच्या कण्यावर होतो व नसा काम करणे बंद करतात. परिणामी स्नायूंची हालचाल बंद होऊन स्नायू आखडतात व जनावरांना हालचाल करता येत नाही व ते खाली पडते.
5- तसेच जनावरांना त्यांचा जबडा उघडता किंवा बंद करता येत नाही व यामुळे पाणी पिणे तसेच खाद्य खाणे देखील बंद होते. शरीरातील स्नायू अंकुचन पावतात. या सगळ्या परिस्थितीमध्ये जर योग्य वेळेमध्ये उपचार मिळाले नाही तर जनावरांचा मृत्यू होऊ शकतो.
6- शेळी आणि मेंढ्यांमध्ये जर आजाराचा प्रादुर्भाव झाला तर सुरुवातीस ताठरपणा येतो व त्यांना चालता येत नाही. तसेच स्नायूंना मुरळ आणि उबळ येते.
7- चेहऱ्याचे स्नायू आखडले जातात व डोळ्याची तिसरी पापणी लक्षनीयरीत्या बाहेर येते व चाल देखील अस्थिर होते. शेपूट ताठर आणि उंच होते.
8- बाधित झालेले जनावर चिंताग्रस्त दिसायला लागते आणि अति उत्साही देखील होते. जनावराचे पोट फुगते व ते रवंथ करणे देखील बंद करते.
9- जनावर खाली पडते तसेच पाय ताठर होतात व स्नायू आखडतात व परिणामी जनावरांचा मृत्यू होतो.
या आजारासाठी प्रतिबंध आणि नियंत्रणात्मक उपाययोजना
1- जनावरांमध्ये आणि खास करून घोड्यांमध्ये टीटी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
2- तसेच जनावर गाभण असतील तर त्यांना धनुर्वाताची लस द्यावी व त्यामुळे मातेकडून अर्भकांना या आजाराच्या विरोधी प्रतिकारशक्ती मिळते व अर्भकांना धनुर्वात होत नाही.
3- लसीकरण केल्यामुळे नवजात अर्भकांमध्ये मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटते. परंतु तरीदेखील जखम झाली तर ती स्वच्छ करण्यावर भर द्यावा.
4- जखम धुण्यासाठी योग्य अशा प्रतीजैविकांचा वापर करावा व गोठे देखील स्वच्छ ठेवावे.
5- तसेच जिवाणूंची संख्या कमी व्हावी याकरिता पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविकांचा वापर करावा.
6- महत्त्वाचे म्हणजे जखम झालेल्या प्राण्यास धनुर्वाताच्या निर्वीषीकरणाची लस देणे गरजेचे आहे. तसेच जनावरांना जखमच होऊ नये यासाठी देखील काळजी घ्यावी.
( या आजाराचे निदान सहसा लक्षणांवरून करता येणे शक्य आहे. तसेच प्रयोग शाळेमध्ये सूक्ष्मदर्शकाखाली देखील जिवाणू पाहून निदान करता येते व ही निदानाची सेवा विद्यापीठाच्या सर्व पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे.)