Goat Breeds:- सध्या संपूर्ण देशामध्ये सुशिक्षित बेरोजगारी ही समस्या खूप उग्र स्वरूप धारण करून देशासमोर उभी आहे व दिवसेंदिवस यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. कारण असे सुशिक्षित तरुण-तरुणींच्या तुलनेत मात्र उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या खूपच कमी असल्याने हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
त्यामुळे आता बरेच युवक हे शेती क्षेत्राकडे वळताना दिसून येत आहे व त्यासोबतच शेतीशी संबंधित असलेल्या जोडधंदांमध्ये देखील अनेक सुशिक्षित युवक पाऊल ठेवताना दिसत आहेत. या शेती क्षेत्राशी निगडित असलेल्या जोडधंद्यांपैकी शेळीपालन हा व्यवसाय खूप फायद्याचा ठरताना दिसून येतो.
कारण हा कमी खर्चात तसेच कमी जागेत सुरू करता येणारा व्यवसाय आहे व मिळणारा नफा देखील चांगला असल्यामुळे हा व्यवसाय फायद्याचा ठरताना दिसतो.
परंतु शेळी पालन व्यवसाय सुरू करत असताना मात्र पालनासाठी शेळ्यांच्या जातिवंत असलेल्या जातींची निवड करणे खूप गरजेचे असते. कारण भारतामध्ये अनेक शेळ्यांच्या जाती असल्यामुळे योग्य जातीची निवड फायद्याचे ठरते. या लेखात आपण अशाच एका शेळीच्या जाती विषयी माहिती घेणार आहोत जी शेळीपालनासाठी खूप फायद्याची ठरेल.
सोनपरी जातीची शेळी देईल लाखोत कमाई
भारतामध्ये अनेक प्रकारच्या शेळ्यांच्या जाती आढळून येतात व या प्रमुख जातींमध्ये सोनपरी शेळीची जात खूप लोकप्रिय अशी आहे. या जातीच्या शेळीपालनातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा मिळवता येणे शक्य आहे. सोनपरी जातीच्या शेळीचे पालन हे प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी केले जाते.
ही शेळी बेरारी आणि ब्लॅक बंगाल या दोन जातींच्या शेळींचा संकरातून विकसित करण्यात आलेली जात आहे. या शेळीचा रंग तपकिरी असतो व पाठीवर डोक्यापासून शेपटीपर्यंत एक काळी रेष असते. हीच काळी रेष सोनपरी शेळीची प्रमुख ओळख आहे. तसेच या शेळीचे शिंगे पाहिले तर ते मागच्या बाजूला वाकलेली असतात.
बंदिस्त शेळीपालनाकरिता शेळीची ही जात खूप फायद्याची असून तुम्ही घराच्या अंगणात देखील तिचे पालन करू शकतात. भारतीय हवामान हे सोनपरी जातीच्या शेळीला लागणाऱ्या हवामानाशी सुसंगत असल्यामुळे तिची भारतामध्ये चांगली वाढ होते. महाराष्ट्रातील हवामान देखील सोनपरी जातीच्या शेळीसाठी चांगले असून तिला ते मानवते.
सोनपरी जातीची शेळी एका वेताला देते चार पिल्ले
सोनपरी जातीच्या शेळ्यांचे जे काही वैशिष्ट्ये आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाचे आणि फायदेशीर वैशिष्ट्य म्हणजे ही शेळी एका वेतामध्ये तब्बल चार पिलांना जन्म देण्यासाठी सक्षम आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे सोनपरी जातींच्या शेळ्यांचे मांस हे चवीला खूप उत्कृष्ट असल्याने बाजारात देखील त्याला चांगली मागणी असते
व त्यामुळे सोनपरी जातीच्या शेळीचे पालन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. जर नवीन शेळीपालन व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तींनी पाच शेळ्या घेऊन शेळीपालनाला सुरुवात केली तरी वर्षाला अडीच ते तीन लाखापर्यंतचे उत्पन्न निश्चित मिळू शकते.