सोयाबीनला मिळतोय कवडीमोल दर ! मग विकण्याची घाई करू नका ; तारण योजनेतून पैशांची व्यवस्था करा ; तारण योजना काय आहे? वाचा इथं

Soybean Rate : सोयाबीनला सध्या अतिशय नगण्य बाजारभाव मिळत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. खरं पाहता सोयाबीन शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून गेल्या काही वर्षात उदयास आले आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला दर देखील मिळाला होता, यामुळे या वर्षी देखील यातून चांगली कमाई होईल या अनुषंगाने या पिकाची पेरणी मोठी वाढली आहे.

मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी नगण्य बाजार भाव मिळाला असून आतापर्यंत दरवाढीची आशा फोल ठरली आहे. दरम्यान जाणकार लोकांनी सोयाबीन कवडीमोल दरात विकण्यापेक्षा तारण योजनेचा लाभ घेऊन सोयाबीन तारण ठेवून गरजेपुरता पैसा उभा करण्याचे आव्हान केले आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातून शेतीमाल तारण योजनेचा खूपच कमी प्रमाणात लाभ घेतला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खरं पाहता यावर्षी जुलै आणि ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या पिकाला मोठा फटका बसला होता. यानंतर ऐन काढण्याच्या अवस्थेत कोसळलेला परतीचा पाऊस उत्पादनात 30 टक्क्यांपर्यंतची घट घडून आणण्यास कारणीभूत ठरला आहे. अशा परिस्थितीत उत्पादनात घट झाली असल्याने सोयाबीनला गेल्यावर्षीपेक्षा अधिक दर मिळाला तर यासाठी झालेला उत्पादन खर्च भरून निघेल असं मत शेतकरी व्यक्त करत आहे.

मात्र तूर्तासं सोयाबीनला गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्च आणि प्रत्यक्षात हाती येणार उत्पन्न याची योग्य सांगड बसत  नसल्याचे चित्र आहे. सध्या मिळत असलेल्या दरात सोयाबीन विक्री केल्यास शेतकऱ्यांना तोटा होणार आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी तारण योजनेचा लाभ घेत सोयाबीन तारण ठेवून गरजेच्या पैशांची उभारणी करण्याचा सल्ला दिला जात आहे.

शेतमाल तारण योजना आहे तरी नेमकी कशी?

खरं पाहता, शेतकरी बांधवांच्या मालाला अनेकदा कवडीमोल दर मिळत असतो. खरीप किवा रब्बी हंगामा नंतर शेतीमाल एकदमच बाजारात येत असल्याने शेतीमालाची आवक जास्त होते आणि परिणामी दर कोसळतात. मात्र जर तर कमी असताना शेतमाल साठवणूक करून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी नेला तर त्या शेतमालास जादा बाजार भाव मिळू शकतो.

मात्र अनेकदा शेतकऱ्यांना पैशांची निकड असल्याने ते कमी दरात देखील शेतमाल विकून टाकतात. शेतकऱ्यांच्या या अडचणींच समाधान म्हणून कृषी पणन मंडळने १९९०-९१ पासून शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला शेतमाल तारण म्हणून किंवा गहाण म्हणून बाजार समितीकडे ठेवता येतो आणि शेतमालाच्या 70 ते 75 टक्के एवढी रक्कम कर्जाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मिळत असते. यामुळे शेतकऱ्यांची पैशाची निकड भागते.

तारण कर्जापोटी आकारलं जात इतकं व्याज

शेतमाल तारण योजनेंतर्गत फक्त शेतकऱ्यांचाच शेतीमाल स्वीकारला जातो. व्यापाऱ्यांचा शेतीमाल या योजनेंतर्गत स्वीकारला जात नाही याची नोंद या ठिकाणी घेतली पाहिजे. तारण कर्जाची मुदत सहा महिने असते. तसेच तारण कर्जास व्याजदर हा ६ टक्के असतो. 

बाजार समित्यांना मिळतो ३ टक्के परतावा

शेतीमाल तारण योजना ही बाजार समित्यांमार्फत राबविली जात असली तर सहा महिन्यांचे आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना तीन टक्के व्याजाची सवलत दिली जाते. 

या पिकांना तारण ठेऊन घेता येते कर्ज 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ यांच्याकडून सुरू करण्यात आलेल्या शेतमाल तारण योजनेअंतर्गत तूर,मूग,उडीद,सोयाबीन,सुर्यफूल,चना,भात, करडई,ज्वारी,बाजरी,मका,गहू,काजू बी,बेदाणा व हळद या शेतमालाला तारण ठेऊन उत्पादक शेतकऱ्यांना शेतीमालाच्या किमतीची 75 टक्के एवढी रक्कम कर्ज म्हणून मिळत असते. या योजनेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चौकशी केली पाहिजे.