पिकावरील कीड नियंत्रणासाठी चिकट सापळा आहे रामबाण! पण पिवळा, काळा, पांढरा, निळा कोणता ट्रॅप वापरायचा ; वाचा याविषयी सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sticky Trap Information Marathi : देशातील शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पिकांवरील किडनियंत्रणासाठी, पिकाच्या वाढीसाठी रासायनिक कीटकनाशकांचा आणि खतांचा अंदाधुंद वापर सुरू केला आहे. यामुळे किड नियंत्रण निश्चितचं होत, पिकांची वाढ होते मात्र यामुळे जमिनीची सुपीकता, मानवाचे आरोग्य, पैशांचा अपव्यय वाढला आहे.

एवढेच नाही तर यामुळे पिकाचा दर्जा देखील खालावला जातो. परिणामी अधिक खर्च करून उत्पादित केलेलं पीक बाजारात अतिशय कवडीमोल दरात विक्री होतं. शिवाय रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा दिवसेंदिवस वापर वाढला असल्याने जमिनीचा पोत ढासळला असून आता उत्पादनात घट होऊ लागली आहे.

परिणामी यावर उपाय म्हणून शेतकरी बांधवांना संतुलित प्रमाणात रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच शक्य असल्यास जैविक पद्धतीने शेती करण्याचा सल्ला दिला जातो. विशेष म्हणजे आता शेतकरी बांधव हळूहळू रासायनिक शेतीचे दुष्परिणाम पाहता सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करू लागले आहेत.

यातून चांगला सकारात्मक परिणाम दिसत आहे. दरम्यान किड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना फेरो मॅन ट्रॅप, चिकट सापळा यांसारख्या जैविक पद्धतींचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, ‘स्टिकी ट्रॅप’ किंवा चिकट सापळा हे असे घरगुती कीटकनाशक आहे जे कोणत्याही विषारी रसायनांचा वापर न करता हानिकारक कीटकांच्या दुष्परिणामांपासून पिकांचे संरक्षण करते.

हे रासायनिक कीटकनाशकांपेक्षा खूपच स्वस्त आहे. चिकट सापळ्यांच्या वापरामुळे कीटकांमुळे पिकांचे होणारे नुकसान 40 ते 50 टक्के कमी होते आणि त्यामुळे पिकांवर, शेतातील माती, पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. चिकट सापळे वापरल्याने पिकावर रासायनिक किंवा सेंद्रिय कीटकनाशके फवारणीचा खर्चही कमी होतो.

सोबतच यामुळे शेतात किंवा पिकावर कोणत्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव चालू आहे तसेच किती प्रमाणात कीटकांचे प्रमाण आहे याचा देखील अंदाज बांधता येतो. निश्चितच यामुळे कीड नियंत्रणात ठेवण्यास मदत होते तसेच पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव आर्थिक मर्यादेपेक्षा अधिक झाला आहे की नाही हे समजतं. पिकांवर कीटकाचा प्रादुर्भाव आर्थिक मर्यादेपेक्षा अधिक झाला तरच रासायनिक कीटकनाशकांचा उपयोग शेतकऱ्यांनी केला पाहिजे.

निश्चितच चिकट सापळे हे कीड नियंत्रण करण्यासाठी बहुउपयोगी ठरू शकतात. मात्र, शेतकऱ्यांना अनेकदा पिवळा, निळा, काळा, अन पांढरा यातून कोणता चिकट सापळा हा वापरायचा याविषयी संभ्रम राहतो. अशा परिस्थितीत आज आपण नेमका कोणता चिकट सापळा किड नियंत्रणासाठी वापरला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत.

पिवळा चिकट सापळा: हे बहुतेक भाजीपाला पिकांमध्ये वापरले जाते. याच्या वापराने पांढरी माशी, ऍफिड, लीफ मायनर इ. आणि मोहरी पिकावर हल्ला करणार्‍या ऍफिड्सवर प्रभावी नियंत्रण मिळू शकते.

निळा चिकट सापळा: भातासह अनेक फुले व भाजीपाला पिकात थ्रीप्स शोषक कीटक नियंत्रित करण्यासाठी निळ्या रंगाचे चिकट सापळे वापरतात.

पांढरे चिकट सापळे: पांढरे चिकट सापळे फळे आणि भाजीपाल्यातील लाल बीटल कीटक आणि बग कीटक नियंत्रित करण्यासाठी वापरले जातात.

ब्लॅक स्टिकी ट्रॅप : टोमॅटोवरील किडीच्या नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो. याचा वापर हा प्रामुख्याने टोमॅटो पिकातच केला जातो.

शेतात चिकट सापळा कसा लावायचा?

शेतात चिकट सापळा टांगण्यासाठी बांबू आणि तार देखील लागते. एक एकर शेतात सुमारे 10-15 चिकट सापळे लावावेत. त्यांची उंची पिकापेक्षा 50 ते 75 सेमी जास्त असावी. ही उंची कीटकांच्या उड्डाण मार्गात येते आणि त्यांना आकर्षित करण्यास मदत करते. चिकट सापळ्यात पुरेसे कीटक अडकले की ते नष्ट करावे आणि चिकट टेप पुन्हा तयार करून शेतात टांगावे. टिन, हार्डबोर्ड आणि प्लॅस्टिक शीटपासून बनवलेले चिकट सापळ्याचे तुकडे वारंवार साफ केल्यानंतर पुन्हा वापरता येतात. तर पुठ्ठ्याचे चिकट सापळे दोन-तीन वापरानंतर खराब होतात. चिकट सापळा नेहमी गरम पाण्याने स्वच्छ केले पाहिजे.