Strawberry Cultivation:- शेती आता पूर्वीसारखी राहिलेली नसून आता शेतीचा चेहरा मोहराच बदलून गेलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आणि आधुनिक पिकपद्धती शेतीमध्ये आल्याने आता शेती खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्टिकोनातून केली जात आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
केवळ उदरनिर्वाह पूर्ती शेती हा दृष्टिकोन कधीच मागे पडला असून आता वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिके, फळपिके इत्यादीच्या माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळवताना दिसून येत आहेत. तसेच जे काही बेरोजगार सुशिक्षित तरुण आहेत ते देखील आता शेतीकडे मोठ्या प्रमाणावर वळले असून शेतीचे संबंधित जोडधंदे आणि फळबागा लागवडीकडे त्यांचा कल मोठ्या प्रमाणावर आहे.
फळपीक लागवडीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातयोग्य फळ पिकांचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेऊ लागले आहेत. याच मुद्द्याला धरून जर आपण जुन्नर तालुक्यातील कोपरे काठेवाडी येथील शेतकरी रमेश बांगर यांच्या स्ट्रॉबेरी शेतीचा विचार केला तर त्यांनी पहिल्यांदाच स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला आणि त्यामध्ये घवघवीत यश मिळवले आहे.
स्ट्रॉबेरी पिकाने दिले लाखो रुपयांचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की जुन्नर तालुक्यातील कोपरी काठेवाडी येथील शेतकरी रमेश बांगर यांनी स्ट्रॉबेरी पिकाचा पहिल्यांदाच प्रयोग केला आणि तो यशस्वी देखील करून दाखवला आहे. या अगोदर शेतामध्ये भात पिक घ्यायचे. परंतु दरवर्षी फक्त त्यांना चार हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते.
यामधून खर्च देखील निघणे कठीण होत असल्यामुळे काहीतरी शेतीमध्ये नवीन प्रयोग करावा असं त्यांच्या मनात कायम होते व त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना त्यांनी 14 गुंठ्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीचा निर्णय घेतला व लागवड देखील केली. त्यांचा हा निर्णय त्यांच्या जीवनामध्ये एक गेम चेंजर म्हणजेच टर्निंग पॉईंट ठरला. स्ट्रॉबेरी लागवड केल्यानंतर संपूर्ण कुटुंबाने दोन महिन्यापासून खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट घेतले व त्यांना आता यशाचे गोड फळ चाखायला मिळत आहे.
स्ट्रॉबेरी लागवड करण्याअगोदर ते दुसऱ्याच्या शेतामध्ये शेतमजूर म्हणून काम करत होते व प्रति दिवसाला त्यांना 300 रुपये मजुरी मिळत होती. त्यांचे काका कराडला राहायला आहेत व त्यांच्या काकांनीच त्यांना स्ट्रॉबेरी लागवडीचा सल्ला दिला. याकरिता रमेश बांगर यांनी त्यांच्याकडूनच उसने पैसे घेतले व 4800 रोपे स्ट्रॉबेरीचे पाचगणी वरून विकत आणले व तिथल्या अनुभवी शेतकऱ्यांशी सल्ला मसलत करून लागवड केली.
स्ट्रॉबेरी पासून चांगले उत्पादन मिळावे याकरिता त्यांनी काही या क्षेत्रात त्या शेतकऱ्यांचे मुलाखती देखील ऐकल्या व व्हिडिओ देखील पाहिले. या माध्यमातून ते जे काही शिकले त्याचा प्रयोग त्यांनी त्यांच्या स्ट्रॉबेरी पिकासाठी केला. मोठ्या कष्टातून पिकवलेली त्यांची स्ट्रॉबेरीची काढणी आता सुरू झालेली असून 14 गुंठ्या मधून बारा दिवसात त्यांना तीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे व पुढील चार महिन्यांपर्यंत स्ट्रॉबेरी काढणी व विक्री सुरू राहील असा अंदाज त्यांना असून या माध्यमातून दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे.
अशाप्रकारे रमेश बांगर यांनी जिद्दीतून शेतीत स्ट्रॉबेरी लागवड करण्याचा निर्णय घेतला व कष्ट आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी चांगले उत्पन्न मिळवले.