Success Story: महाराष्ट्रातील ह्या शेतकऱ्याने कोथिंबीर पिकातून दोन महिन्यात घेतले 16 लाखांचे उत्पन्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story:-  बरेच शेतकरी जास्त कालावधीच्या पिकांची लागवड न करता कमीत कमी वेळामध्ये येणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड करतात. कारण भाजीपाला लागवड ही बऱ्याच दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असते. म्हणजे कमीत कमी कालावधीमध्ये बाजार भाव चांगला मिळाला तर आर्थिक उत्पन्न चांगले मिळते आणि कमीत कमी कालावधीमध्ये पैसा देखील हातात येतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे याकरिता लागणारा खर्च इतर पिकांपेक्षा निश्चितच कमी असतो.

आपण पालेभाज्यांचा विचार केला तर यामध्ये शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणावर मेथी आणि कोथिंबिरीची लागवड करतात. यामध्ये कोथिंबिरीला बऱ्याचदा चांगला बाजार भाव मिळतो. खास करून उन्हाळ्यामध्ये जर कोथिंबिरीचा प्लॉट यशस्वी केला तर नक्कीच चांगला बाजार भाव सापडतो. कधी कधी बऱ्याचदा जास्त पाऊस झाल्यामुळे कोथिंबिरीचे प्लॉट खराब होतात.

परंतु काही शेतकऱ्यांनी जर योग्य व्यवस्थापन ठेवले आणि कोथिंबीर चा प्लॉट यशस्वी केला तर नक्कीच या कालावधीत देखील खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना बाजार भाव मिळतो. याच पद्धतीने लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कोथिंबीर लागवड केली व पावसाच्या कालावधीत देखील यशस्वी करून दाखवली. या माध्यमातून त्यांना लाखो रुपयांचा नफा मिळाला आहे. याच शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात पाहणार आहोत.

 दोन महिन्यात कोथिंबीर लागवडीतून सोळा लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, लातूर जिल्ह्यातील आशिव या गावचे शेतकरी रमाकांत वळके पाटील एक प्रयोगशील शेतकरी आहेत. जर यांचा शेतीचा विचार केला तर हे प्रामुख्याने त्यांच्या शेतामध्ये द्राक्ष आणि ऊस यासारखे पिकांची लागवड करत असत. परंतु या पिकांपासून मिळणारे आर्थिक उत्पन्नाचे गणित पाहिले तर संपूर्ण खर्च आणि मेहनत वजा केले तर हाती काहीच राहत नव्हते.

त्यामुळे रमाकांत वळके पाटील यांच्या मनामध्ये काहीतरी शेतीत नवीन प्रयोग करावा हे सातत्याने सुरू होते. यामधूनच त्यांच्या लक्षात आले की फळबागेतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळते असे नव्हे तर योग्य वेळी जर पालेभाज्यांची लागवड केली तरी शेतकऱ्याला लखपती बनवण्याची क्षमता यामध्ये आहे हे त्यांना उमजले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतात असलेल्या फळबागेच्या क्षेत्रावर कोथिंबिरीची लागवड केली व आता त्यांच्या शेतामध्ये कोथिंबिरीचे पीक बहरले आहे.

साधारणपणे गेल्या पाच वर्षापासून ते कोथिंबिरीचे उत्पादनात सातत्य ठेवून आहेत. कोथिंबिरी मधून वर्षाकाठी त्यांना लाखो रुपयांचा नफा मिळत आहे. साधारणपणे त्यांच्याकडे एकूण जमिनीचे क्षेत्र वीस एकर इतके असून यामध्ये ते ऊस आणि द्राक्ष यासारखे पिकांचे उत्पादन घेत होते. या पिकांच्या माध्यमातून अपेक्षित नफा न मिळाल्यामुळे त्यांनी गेल्या चार ते पाच वर्षांपासून कोथिंबीर लागवड करणे सुरू केले आहे.

कोथिंबीर लागवडीचा त्यांचा निर्णय योग्य ठरला असून कोथिंबिरीने त्यांचे जीवनच बदलून टाकलेले आहे. कोथिंबीर लागवड सुरू केल्यानंतर पहिल्याच वर्षापासून ते लाखो रुपयांचा नफा मिळवत असून यावर्षी तर त्यांनी तब्बल 16 लाख रुपयांची उत्पन्न कोथिंबीर पिकाच्या माध्यमातून मिळवले आहे. विशेष म्हणजे 16 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवायला त्यांना फक्त दोन महिन्याचा कालावधी लागलेला आहे.

 गेल्या चार वर्षात एक कोटी पेक्षा जास्त उत्पन्न

आश्चर्य करणारी बाब म्हणजे गेल्या चार वर्षापासून जेव्हा ते कोथिंबीरीची लागवड करायला लागले तेव्हापासून जर सगळे गणित काढले तर एकट्या कोथिंबीर पिकातून त्यांनी एक कोटी पेक्षा जास्त आर्थिक उत्पन्न मिळवले आहे. त्यांच्याकडे 20 एकर जमीन असून त्यातील पाच एकर जमिनीवर ते कोथिंबीर पीक घेतात.

एकरी वीस हजार याप्रमाणे पाच एकर करिता एक लाख रुपये त्यांना खर्च येतो. या आकडेवारीनुसार दीड महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी 14 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. कोथिंबीरीच्या माध्यमातून जे त्यांनी आर्थिक उत्पन्न मिळवले त्यातून त्यांनी लातूर शहरांमध्ये स्वतःचे घर देखील घेतले. अशा पद्धतीने अभ्यासपूर्ण रीतीने जर शेती केली आणि पीक पद्धतीत बदल केला तर नक्कीच पालेभाज्या देखील खूप चांगल्या प्रकारे आर्थिक नफा देऊ शकतात हे रमाकांत वळके पाटील यांच्या उदाहरणावरून दिसून येते.