Successful Farmer: अरे व्वा! नोकरीं नाही मिळाली, सूरू केला रोप तयार करण्याचा व्यवसाय, आज 30 लाखांची कमाई

Successful Farmer: देशातील नवयुवक उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या कंपनीत किंवा सरकारी विभागात नोकरी करण्याचे स्वप्न बघत असतात. मात्र आजच्या या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला नोकरी मिळणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत ज्या नवयुवकांना नोकरी मिळत नाही ते नवयुवक कमाई करण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत असतात.

आपल्या ज्ञानाचा वापर करत हे नवयुवक वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन करत असतात. विशेष म्हणजे अलीकडे नवयुवक शेती व्यवसायात (Farming) मोठ्या प्रमाणात पदार्पण करत आहेत. शेतीमध्ये भरपूर वाव असल्याने नव युवकांना शेतीव्यवसायात चांगली कमाई (Farmer Income) देखील होत आहे. मध्यप्रदेश मधील एका नवयुवकाने देखील नोकरी मिळाली नाही म्हणून शेती संबंधित व्यवसायात (Agriculture Business) लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मध्यप्रदेश मधील बुऱ्हाणपूरच्या किरण महाजन या नवयुवकाने उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी शोधाशोध सुरू केली. मात्र त्यांना नोकरी मिळाली नाही. मग काय किरण यांनी टिशू कल्चर टेक्निकचा (Tissue Culture Technique) वापर करून रोपांची निर्मिती सुरू केली. आजच्या घडीला किरण उच्च प्रतीचे रोपे तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहेत. किरण आज रोजी रोप विक्रीतून लाखो रुपये उत्पन्न कमवत आहेत.

किरण ज्या भागातून येतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केळीची लागवड (Banana Farming) केली जाते. सुरुवातीच्या काळात तेथील शेतकरी (Farmer) साधारण जातीची केळीची लागवड करत असत. मात्र काळाच्या ओघात तेथील शेतकऱ्यांनी केळीच्या लागवडीत मोठा बदल करायला सुरुवात केली.

तेथील शेतकरी बांधवांनी साधारण जातीची केळी लावण्यापेक्षा टिशू कल्चरने तयार करण्यात आलेल्या केळी रोपे लावण्यावर अधिक भर दिला. मग काय अनेक कंपन्यांनी टिशू कल्चर ने केळीची रोपे तयार करण्यास सुरुवात केली. मात्र असे असले तरी शेतकऱ्यांची गरज त्यां कंपन्या पूर्ण करू शकत नव्हत्या. अशा परिस्थितीत किरण महाजन यांनी टिशू कल्चरचा उपयोग करून केळीची रोपे तयार करण्यास सुरुवात केली.

वर्षाकाठी 30 लाखांची कमाई

किरण यांनी पुणे आणि बंगळुरू येथे जाऊन टिशू कल्चर टेक्निकचा अभ्यास केला, लॅबमध्ये टिशू कल्चरचा वापर करून कशा पद्धतीने वनस्पती तयार केल्या जातात याचे प्रशिक्षण घेतले  आणि त्यांच्या परिसरात टिश्यू कल्चर लॅब उभारली. खर्च आणि कमाई या दोन्ही बाबतीत टिश्यू कल्चरपासून केळीची रोपे तयार करण्याचे काम त्यांच्यासाठी सर्वात योग्य असल्याचे त्यांना वाटले, मग त्यांनी एक छोटी टिश्यू कल्चर लॅब तयार केली.

आज ते वर्षाला सुमारे 10 ते 12 लाख रोपांचे उत्पादन करतात. एक रोप तयार करण्यासाठी त्यांना 8 ते 9 रुपये खर्च येतो. ते 12 ते 13 रुपयांना विकतात. अशाप्रकारे 10 ते 12 लाख रोपांची विक्री करून त्यांना वर्षाला 25 ते 30 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.

टिश्यू कल्चर तंत्रात, बायो लॅबमध्ये झाडाच्या ऊतींचे गुणाकार करून कमी वेळात 500 ते 1000 झाडे तयार केली जातात. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध तंत्रांचा वापर केला जातो. यानंतर 2-2 इंची रोपे तयार झाल्यानंतर रोपे पॉलिथिनमध्ये ठेवून रोपवाटिकेत वाढवली जातात. त्यानंतर ती रोपे शेतकऱ्यांना दिली जातात.

रोपे 10 महिन्यांनी फळे देण्यास सुरुवात करतात

टिश्यू कल्चर पद्धतीने रोपे कशी तयार केली जातात आणि ती तयार करण्याचा किती फायदा होतो हे आता तुम्हाला समजले असेल. आता जाणून घ्या काय आहे या वनस्पतींची खासियत. टिश्यू कल्चरपासून तयार केलेली झाडे शेतात लावल्यानंतर 9 ते 10 महिन्यांनी फळ देण्यास सुरुवात करतात. एवढेच नाही तर या केळ्यांची फळे बिया नसलेली, आकाराने मोठी आणि गोड असतात. तसेच टिश्यू कल्चरपासून तयार होणाऱ्या वनस्पतींचे उत्पादनही इतर जातींच्या तुलनेत जास्त आहे.

यामुळे दिवसेंदिवस टिशू कल्चर च्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या रोपांची मागणी वाढत आहे. या परिस्थितीत किरण महाजन यांना मोठा फायदा होत आहे. निश्चितच किरण महाजन यांनी शेतीशी निगडित व्यवसायात चांगली कामगिरी केली असून किरण इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत बनले आहेत.