सध्या बदलती हवामान परिस्थिती आणि वारंवार येणारा अवकाळी पाऊस व गारपीटी सारख्या नैसर्गिक संकटांमुळे इतर पिकांसोबत फळपिके देखील मोठ्या प्रमाणावर प्रभावित होताना दिसून येत असून अशा वातावरणामुळे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव व त्यामुळे वाढलेला उत्पादन खर्च, अवकाळीमुळे होत असलेले फळपिकांचे नुकसान यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
परंतु तरी देखील काही शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून, योग्य व्यवस्थापनाच्या पद्धती आणि कष्ट यांच्या जोरावर भरघोस उत्पादन मिळवताना देखील दिसून येत आहेत. जर फळबागांमध्ये द्राक्ष बागेचा विचार केला तर हे पीक हवामान बदलाला खूपच संवेदनशील असल्यामुळे उष्णता किंवा अवकाळी पाऊस इत्यादी गोष्टींचा खूप विपरीत परिणाम द्राक्षबागांवर होतो.
त्यामुळे दिवसेंदिवस द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. यावर्षी देखील साधारणपणे हीच परिस्थिती पाहायला मिळाली. यंदा द्राक्ष दरामध्ये चढ-उतार आहेतच.परंतु एकरी उतारा देखील कमी मिळत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.
परंतु सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असल्यामुळे व उन्हाचा पारा वाढल्यामुळे द्राक्ष भावांमध्ये थोडीफार सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीचा फायदा उठवत तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथील सुदर्शन जाधव या कृषी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याने अवघ्या चाळीस गुंठे क्षेत्रांमध्ये 14 टन द्राक्षाचे उत्पादन घेऊन त्यातून तब्बल 13 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न देखील मिळवले आहे.
चाळीस गुंठे जमिनीत घेतले द्राक्षाचे 14 टन उत्पादन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथील कृषी पुरस्कार मिळवलेले शेतकरी सुदर्शन जाधव प्रगतिशील शेतकरी आहेत व त्यांनी त्यांच्या चाळीस गुंठे क्षेत्रामध्ये 14 टन द्राक्षाचे उत्पादन घेण्याची किमया साध्य केली असून एकूण द्राक्ष उत्पादनातून 12 टन द्राक्ष त्यांनी युरोपला निर्यात केली आहेत
व त्या ठिकाणी त्यांना किलोला ९५ रुपयाचा दर मिळाला असून त्या माध्यमातून तेरा लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळवले आहे. सुदर्शन जाधव यांच्याकडे एकूण 13 एकर क्षेत्रामध्ये द्राक्ष बाग लागवड आहे. यातील माळरान जमिनीवर कष्ट करून त्यांनी द्राक्ष बागेतील 40 गुंठे जमिनीत क्लोन 2 एवन जातीच्या द्राक्षाची लागवड केली व त्या माध्यमातून त्यांना 14 टन उत्पादन मिळाले आहे.
विशेष म्हणजे शेताच्या बांधावर त्यांना किलोला 95 रुपयाचा दर मिळाला. या मिळालेल्या एकूण 14 टन द्राक्ष उत्पादनातून त्यांनी 12 टन द्राक्षाची युरोपमध्ये निर्यात केली. तसेच मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये उन्हाचे प्रमाण वाढू लागल्यामुळे द्राक्ष भावामध्ये सुधारणा झाली व याचा फायदा सुदर्शन जाधव यांना होऊन एका एकरमध्ये त्यांनी तब्बल 13 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.
यावर्षी महाराष्ट्रात सगळीकडे दुष्काळी स्थिती असून विहिरी आणि बोरवेल्स कोरडेठाक पडलेले आहेत. परंतु या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेला पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणून त्यांनी एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले असून या माध्यमातून पुढील तीन महिन्यापर्यंत पाणी पुरेल एवढा पाण्याचा साठा त्यांनी करून ठेवलेला आहे. म्हणून त्यांना संपूर्ण उन्हाळ्याचा कालावधी संपेपर्यंत द्राक्ष बागेसाठी पाण्याची कुठल्याही प्रकारची चिंता नाही.