नाशिक जिल्हा म्हटला म्हणजे प्रामुख्याने द्राक्ष आणि कांदा या पिकांची लागवड डोळ्यासमोर येते. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तसेच सिन्नर व इगतपुरी, निफाड इत्यादी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बाग आहेत. परंतु गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती आणि घसरलेले दर यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांमध्ये नुकसान सोसावे लागले व आर्थिक फटका बसला.
त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील काही शेतकरी द्राक्ष बागा तोडून वेगळ्या पिकांकडे वळल्याचे चित्र आहे. अगदी याच प्रकारे दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथील गणपतराव घुमरे यांनी द्राक्ष शेतीचा नाद सोडून 28 गुंठ्यामध्ये पॉलिहाऊस उभारले व विविध प्रकारच्या भाजीपाला पिकातून विक्रमी उत्पन्न मिळवायला सुरुवात केलेली आहे.
28 गुंठे पॉलिहाऊसमध्ये घेतले काकडीचे विक्रमी उत्पादन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सातत्याने येत असलेली दुष्काळाची परिस्थिती तसेच नैसर्गिक संकट इत्यादी परिस्थितीवर मात करत दिंडोरी तालुक्यातील शिवनई या गावचे गणपतराव घुमरे यांनी तंत्रज्ञानाची आणि प्रयोगशीलतेची एकमेकांना जोड देत 28 गुंठे क्षेत्रामध्ये पॉलिहाऊस उभारले व यात काकडीचे विक्रमी उत्पादन घेतले.
बऱ्याच पिकांना सध्या बाजारामध्ये व्यवस्थित भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत व गणपतराव यांनी मात्र बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन काकडीच्या नवीन वाणाची लागवड करून चांगल्या उत्पादनाची किमया साध्य केली आहे. गणपतराव घुमरे यांच्या शेतामध्ये अगोदर द्राक्ष बाग होती.
सातत्याने येत असलेल्या नैसर्गिक संकट आणि मिळणारा कमी बाजार भाव यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कर्जाचा डोंगर वाढला. या कर्जाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी अगोदर द्राक्षाची बाग तोडली आणि बँकेतून कर्ज घेऊन 28 गुंठे क्षेत्रामध्ये पॉलिहाऊसची उभारणी केली.
अगोदर त्यांनी पॉलिहाऊस मध्ये शिमला मिरची आणि नंतर गुलाबाचे चांगले उत्पादन घेतले व या माध्यमातून त्यांनी पॉलिहाऊस साठी घेतलेले सर्व कर्ज फेडले. आज देखील त्यांची शेती नफ्यामध्ये आहे. नंतर त्यांनी कालांतराने गुलाबाची बाग काढून टाकली आणि नवीन पिक लावण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित अभ्यास केला व काकडीच्या दोन वानांची लागवड करायचे ठरवले.
काकडी लागवडीनंतर योग्य व्यवस्थापन ठेवून त्यांनी काकडीची शेती देखील यशस्वी करून दाखवली. सध्या एका दिवसाआड त्यांना या 28 गुंठे पॉलिहाऊस मधून काकडीचे 70 ते 100 कॅरेट उत्पादन मिळत आहे चांगला दर मिळत असल्याने त्यांना आर्थिक उत्पन्न देखील चांगले मिळत आहे.
2016 मध्ये त्यांनी द्राक्षबाग तोडले व 25 लाखांचे कर्ज घेऊन पॉलिहाऊस उभारले होते. तेव्हा त्यांनी मिरची आणि गुलाबाची लागवड करून त्यातून उत्पन्न मिळवत कर्जही फेडले व त्यानंतर आता काकडीची लागवड करून चांगले आर्थिक उत्पन्न त्यांनी मिळवले आहे.