Success Story: वयाच्या 62 व्या वर्षी ही महिला करते दररोज 1 हजार लिटर दुधाची विक्री व महिन्याला कमावते 4 लाख रुपये नफा! वाचा यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story:- तुम्हाला जीवनाच्या एखाद्या क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर त्याकरिता तुमच्यात जिद्द, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असावी लागते. हे गुण जर तुमच्यामध्ये असले तर तुमचे वय काय आहे याला देखील काही अर्थ राहत नाही.

कुठलीही गोष्ट करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर व्यक्ती कुठल्याही वयामध्ये रस्त्यातील सर्व अडथळे पार करत यशाचे शिखर गाठू शकतात. असे अनेक उदाहरणं आपल्याला या समाजात दिसून येतात.

याच मुद्द्याला धरून जर आपण गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील नागाना या गावच्या नवलबेन दलसंगभाई चौधरी यांचे उदाहरण घेतले तर ते या मुद्द्याला साजेसे आहे. त्यांनी वयाच्या 62 व्या वर्षी तरुणांना लाजवेल असे काम करून दाखवले असून डेअरी व्यवसायामध्ये लाखो रुपये कमावण्याची किमया साध्य केली आहे.

 वयाच्या 62 व्या वर्षी डेरी व्यवसायातून साधली आर्थिक प्रगती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील नागाना या गावच्या नवलबेन चौधरी यांचे वय आता 62 वर्ष इतके आहे. परंतु या वयात देखील त्यांनी कोरोना कालावधीत दूध व्यवसायाला सुरुवात केली व स्वतःच्या ताकतीवर आज कोट्यावधींच्या घरात व्यवसाय नेऊन ठेवला आहे.

जेव्हा त्यांचा विवाह झाला होता तेव्हा त्यांच्या घरी पंधरा ते वीस जनावरे होती व या माध्यमातून त्यांचे सासरचे कुटुंब दूध व्यवसाय करत होते.हाच व्यवसाय पुढे यशस्वीरित्या चालवत आणि त्यामध्ये भर घालत त्यांनी कोट्यावधींचा व्यवसाय आता उभा केला आहे.

त्यांच्या या सगळ्या दूध व्यवसायामध्ये त्यांच्याकडे 80 म्हशी आणि 45 गाई आहेत. त्यांना चार मुले असून ते शहरांमध्ये वेगवेगळे काम करतात. विशेष म्हणजे त्यांचे चार मुले जितके पैसे कमवतात त्यापेक्षा जास्त पैसा नवलबेन या 62 व्या वर्षी कमावतात.

साधारणपणे 2020 पासून त्यांनी या व्यवसायामध्ये प्रामुख्याने वाढ केली. आजमीतिला दररोज ते 1000 लिटर दुधाची विक्री करतात व महिन्याची जर त्यांची कमाई पाहिली तर ती साधारणपणे साडेतीन ते चार लाखाच्या घरात आहे. त्यांच्या या व्यवसायाबद्दल माहिती देताना त्या म्हणतात की मी 80 म्हशी आणि 45 गाईंचे संगोपन करते

व या माध्यमातून 2019 मध्ये 87.95 लाख रुपयांची दूध विक्री केली व एवढेच नाही तर 2020 मध्ये त्यांनी एक कोटी दहा लाख रुपयांची दूध विकल्याची माहिती देखील त्यांनी दिली. विशेष म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये अमुलच्या दहा मिलेनियर रुरल वुमन आंत्रप्रेनर्सच्या यादीमध्ये नवलबेन यांचा समावेश करण्यात आलेला होता.

त्यांच्या या सगळ्या डेरी व्यवसायामध्ये त्यांना 15 कर्मचाऱ्यांची मदत होते. त्यांच्या या कामामुळे त्यांना बनासकंठा जिल्ह्यातील सर्वाकृष्ट पशुपालक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे व त्यासोबत दोन वेळा लक्ष्मी पुरस्कार देखील मिळाला आहे.

यावरून आपल्याला दिसून येते की, व्यक्तीचे वय कितीही असले तरी व्यक्तीमध्ये जर जबर इच्छाशक्ती व ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी कष्ट व जिद्द असेल तर व्यक्ती यश मिळवू शकते.