Farmer Success Story:- मागच्या वर्षी संपूर्ण राज्यामध्ये अत्यल्प पाऊस झाला व त्यामुळे भूजल पातळी खालवून विहिरी तसेच बोरवेल्स कोरड्याठाक पडल्याची स्थिती महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फळबागा तसेच विविध रब्बी हंगामातील पिके जगवताना खूप मोठ्या प्रमाणावर समस्या आल्या.
कारण पाण्याशिवाय कुठलेही पीक येऊ शकत नाही हे आपल्याला माहिती आहे. त्यातल्या त्यात जर आपण नाशिक जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग म्हणजेच मनमाड किंवा येवल्याचा परिसर बघितला तर उन्हाळ्याची सुरुवात होईपर्यंत त्या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष जाणव लागते व पाणीटंचाईच्या झळा पोहोचायला लागतात.
प्यायच्या पाण्याचे वांदे या परिसरामध्ये होतात. त्यामुळे शेतीला पाणी हा तर लांबचा विषय राहतो. परंतु तरीदेखील प्यायच्या पाण्याचे वांदे असताना येवला तालुक्यातील देवठाण येथील संदीप पवार या शेतकऱ्याने मात्र हिरव्या व लाल मिरची तसेच अद्रक या पिकांच्या उत्पादनातून तब्बल 18 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवले आहे आहे व हे या शेतकऱ्याने शेततळ्याच्या जीवावर शक्य करून दाखवले.
संदीप पवार यांनी शेततळ्याच्या जीवावर घेतले 18 लाखांचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या देवठाण येथील संदीप पवार या शेतकऱ्याने आद्रक व हिरवी, लाल मिरचीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्यात यश मिळवलेले आहे.
तसे पाहायला गेले तर येवला हा परिसर प्रामुख्याने कोरडवाहू पिके घेणारा परिसर म्हणून ओळखला जातो. परंतु आता तिकडेच शेतकरी कांदा तसेच कपाशी तसेच मका या पिकांचे लागवड मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत.
या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी शेततळ्याचा पर्याय शोधला असून या पाण्याचा वापर करून विविध पिकांच्या माध्यमातून भरघोस उत्पादन मिळवायला सुरुवात केलेली आहे. याच पद्धतीने संदीप पवार हे कृषी विभागाच्या संपर्कात आले व त्यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळवत शेततळे खोदले व त्यात प्लास्टिक अस्तरीकरण केले.
याच शेततळ्यातील पाण्याचा व्यवस्थित वापर करत उत्तम पद्धतीने उत्पादन मिळवले. तसे पाहिले गेले तर संपूर्ण राज्यांमध्ये मागच्या वर्षी खूप कमी प्रमाणामध्ये पाऊस झालेला होता. तरी देखील संदीप पवार यांनी उपलब्ध पाण्यावर शेततळे भरून ठेवले व या पाण्याचा वापर दुष्काळ असताना देखील केला
व दुष्काळामध्ये सहा एकर क्षेत्रापैकी एका एकरमध्ये हिरवी मिरचीची लागवड ऑगस्टमध्ये केली व दोन एकर क्षेत्रात रेड पेपरिका या लाल मिरचीची लागवड चार फूट बाय सव्वा फुट अंतरावर ऑक्टोबर महिन्यात केलेली होती.
मिरची सोबतच त्यांनी माहीम व आरमार या आद्रक वाणांची लागवड करून दुष्काळात पाण्याची योग्य नियोजन व त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन भरघोस उत्पादन मिळवले. त्यामध्ये त्यांना कृषी सहाय्यक संतोष गोसावी तसेच कृषी पर्यवेक्षक विठ्ठल सोनवणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
किती केला खर्च व किती मिळाले उत्पन्न?
तीनही प्रकारच्या पिकांसाठी त्यांनी इस्रायल ठिबक केले व त्यासाठी वीस हजार, मल्चिंग पेपर करता 20000 व रोपे, खते व बुरशीनाशक तसेच आवश्यक मजुरी याकरिता मिळून चार लाख 50 हजार रुपये त्यांना खर्च आला. त्यामध्ये त्यांनी 15 टन हिरवी मिरचीचे उत्पादन घेतले
व त्याला चाळीस रुपये प्रति किलोला दर मिळाला व तीन टन लाल मिरचीचे उत्पादन घेऊन त्या लाल मिरचीला 295 रुपये दर मिळाला. तसेच माहीम वाणाच्या आद्रकाची लागवड केली
व त्या माध्यमातून 10 टन आल्याचे उत्पादन मिळून त्या आल्याला सरासरी 85 रुपये इतका बाजार भाव मिळाला व या तिन्ही पिकांच्या माध्यमातून त्यांना एकूण खर्च वजा जाता 18 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.