कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध प्रकारच्या भाजीपाला पिके तसेच फळ पिकांची लागवड इत्यादी माध्यमातून आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये उत्पन्न मिळवताना दिसून येत आहेत.
तसेच आता सुशिक्षित तरुणांच्या तुलनेने उपलब्ध नोकऱ्यांची संख्या खूपच कमी असल्याने ग्रामीण भागातील अनेक तरुण आता शेतीकडे वळले आहेत व ते शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपरिक पिकांना फाटा देत वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेऊन आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करताना दिसून येत आहेत.
तसेच तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आता देशाच्या कुठल्याही भागातील पीक कुठेही उत्पादित करता येणे शक्य झालेले आहे. याचे उत्तम उदाहरण आपल्याला सफरचंदाचे घेता येईल. सफरचंद हे वास्तविक हिमाचल आणि जम्मू सारख्या थंड प्रदेशात येणारे पीक म्हणून ओळखले जायचे.
परंतु आता हे महाराष्ट्रासारख्या उष्ण प्रदेशात देखील शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवले आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण फणस या फळपिकाचा विचार केला तर हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग,
रत्नागिरी सारख्या कोकण किनारपट्टीलगत असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर पिकते. परंतु या फणसाचे यशस्वीरित्या उत्पादन भातपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपुरात फणसाची लागवड यशस्वी केलेली आहे.
चंद्रपुरात बहरले फणसाचे पीक
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर हा महाराष्ट्रातील धान पिकासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा असून या ठिकाणी सुमित समर्थ नावाच्या एका तरुण शेतकऱ्याने तंत्रज्ञानाचा वापर करून खडकाळ जमिनीवर फणसाची लागवड यशस्वी करून दाखवली आहे.
विशेष म्हणजे या शेतकऱ्याने फणसाचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतले आहे. सुमित समर्थ यांनी साधारणपणे खडकाळ जमिनीमध्ये दीड वर्षांपूर्वी 400 फणसांच्या झाडांची लागवड केली व संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने म्हणजे शेणखताचा वापर करून या फणस बागेचे उत्तमरीत्या सुमित यांनी जोपासना केली.
आज या फणसापासून त्यांना उत्पादन मिळायला लागले असून चंद्रपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेले जात आहे. हवामान बदलानुसार शेतीचे नियोजन करून आणि जे पाणी उपलब्ध आहे त्यातील प्रत्येक थेंबाचा योग्य रीतीने वापर करत कुठल्याही प्रकारचे उत्पादन घेता येते हे सुमित समर्थ यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.
त्यांनी एक एकर खडकाळ जमिनीवर 450 फणसाच्या झाडांची लागवड प्रायोगिक तत्त्वावर केलेली होती. या झाडांची जोपासना करताना त्यांनी कुठल्याही प्रकारचे रासायनिक खतांचा वापर न करता फक्त शेणखत आणि वर्मी कंपोस्टचा वापर करून आज शेकडो क्विंटल फणसाचे उत्पादन घेतले आहे. एवढेच नाही तर या माध्यमातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळायला लागले आहे.
सुमित समर्थ यांनी सोळा एकरमध्ये केलेली आहे विविध फळ झाडांची लागवड
फणसासोबतच त्यांनी त्यांच्या उरलेल्या 16 एकर क्षेत्रामध्ये सिताफळ, चिकू, आंबा, ड्रॅगन फ्रुट, नारळ, शेवगा, करवंद संत्रा, मोसंबी, डाळिंब, रामफळ, अंजीर, खजूर, सोनकेळ, जांभूळ सारख्या इतर फळ पिकांची लागवड केलेली आहे.
यावरून आपल्याला दिसून येते की, शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य व्यवस्थापन ठेवले तर कुठल्याही वातावरणामध्ये कुठलेही पीक घेता येणे शक्य आहे. त्यासाठी कष्ट आणि ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द हे गुण असणे आवश्यक आहे.