Goat Rearing:- जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुमचे वास्तव्य शहरी भागात आहे किंवा ग्रामीण भागात आहे याला अजिबात महत्व नाही. तुमच्यात यशस्वी होण्यासाठी असलेली पॅशन किती प्रमाणात आहे? यशासाठी लागणारे कष्ट व जिद्द तुमच्यात आहे का? मनात ठासवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची तयारी व परिस्थितीशी दोन हात करण्याची क्षमता तुमच्यात असेल तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी होऊ शकतात.
यामध्ये मात्र ज्या क्षेत्राचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही, पुरेशी माहिती देखील नाही व अशा क्षेत्रांमध्ये तुम्ही पाऊल ठेवणे व यशासाठी धडपडणे हे जरा जोखमीचे वाटते व यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. परंतु सातत्य आणि कष्ट व जिद्दीच्या जोरावर मात्र यामध्ये यशस्वी होता येते. अगदी हा मुद्दा समजून घ्यायचा असेल तर सुमित भोसले या तरुणाचे उदाहरण आपल्याला घेता येईल.
मुंबई सोडली आणि थेट गाव गाठून सुरू केले बंदिस्त शेळीपालन
सुमित भोसले चा जन्म मुंबईमध्ये झाला व लहानाचा मोठा देखील सुमित मुंबईतच झाला. मुंबईमध्ये शिक्षण घेत असताना सुमितने बीएससी पूर्ण केली व मुंबईमध्येच एका ऍग्रोच्या मासिकामध्ये नोकरी करायला सुरुवात केली. पण नोकरीव्यतिरिक्त दुसरे काहीतरी करावे ही इच्छा मनात असल्यामुळे नोकरीमध्ये मन लागत नव्हते व 2014 मध्ये नोकरी सोडली.
नोकरी सोडल्यानंतर गावाकडे येऊन काहीतरी व्यवसाय सुरू करावा असे मनात चालले होते. परंतु कुठला व्यवसाय सुरू करावा याबाबत चाचणी देखील सुरू होती. अशाप्रकारे चाचणी सुरू असताना मुंबई मधील गोरेगाव येथे शेळी पालन व्यवसाय संदर्भात प्रशिक्षण सुरू होते व ते प्रशिक्षण घेण्याचे सुमितने ठरवले.
अशा पद्धतीने शेळी पालन प्रशिक्षण पूर्ण केले व गावी येऊन शेळी पालन व्यवसायाला सुरुवात केली. याकरिता सुमितने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेल्या तळवडे या गावी सासऱ्याच्या जमिनीमध्ये बंदिस्त शेळी पालन व्यवसायाला सुरुवात केली.
बंदिस्त शेळीपालनामध्ये सुमित करतो 13 जातींच्या शेळीचे पालन
अशाप्रकारे बंदिस्त शेळी पालन व्यवसाय सुरू केला व यामध्ये तब्बल 13 जातींच्या शेळीचे पालन सुरू केले. या शेळीपालना मध्ये त्याने जातीनुसार शेळ्यांचे वर्गीकरण केले. भारतामध्ये जवळपास 32 ते 35 जातीच्या शेळ्या उपलब्ध आहेत व त्यामधील 13 जातींची संगोपन सुमित या बंदिस्त शेळीपालन प्रकल्पात करतो.
या शेळ्यांना ओला तसेच सुखाचारा व खुराक अशा प्रकारचा आहार दिला जातो. विशेष म्हणजे शेळ्यांना लागणारा चारा देखील स्वतःच्या जमिनीमध्येच सुमित उपलब्ध करतो. तसेच व्यवस्थापनामध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व दिले गेले आहे. शेळ्यांना लागणारा खुराक बाजारातून विकत घेतला जातो. त्यासोबतच 24 तास स्वच्छ पाण्याची उपलब्धता देखील शेळ्यांना केली गेली आहे.
कसे आहे विक्री व्यवस्थापन?
बोकड तयार होण्याचे वय पाहिले तर ते 20 ते 80 किलो वजनापर्यंत तयार व्हायला एक वर्षाचा कालावधी लागतो. सुमित त्याच्या प्रकल्पामध्ये विक्रीसाठी तयार झालेले बोकड हे गोवा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणच्या मार्केटमध्ये पाठवतो. याठिकाणी प्राण्याची गुणवत्ता कशी आहे यावर दर मिळतो.
किरकोळ बाजारामध्ये साडेचारशे ते पाचशे रुपये किलो दराने जिवंत बोकड विकला जातो. तसेच ब्रीडिंगचा बोकडाचा दर हा जातीची गुणवत्ता कशी आहे त्यानुसार ठरतो. तसेच पाळण्यासाठी जे लोक शेळी घेतात त्यांच्यासाठी वेगळा दराने विक्री केली जाते. तसेच या शेळीपालनातून निर्माण होणारे लेंडी पासून देखील सुमित यांना आर्थिक उत्पन्न मिळते.
मित्राच्या बंदिस्त शेळीपालन प्रकल्पात 200 पेक्षा जास्त शेळी व बोकड आहेत व त्यापासून 40 ते 45 टन लेंडी खत जमा होते. ही लेंडी मार्केटमध्ये तीन प्रकारे सुमित विकतो. या लेंडी पासून कंपोस्ट खत तयार करून देखील विकले जाते. एवढेच नाही तर या लेंडीची पावडर तयार करून शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांना कुंडीमध्ये लावलेल्या झाडांना खत म्हणून देखील विकली जाते.
तसेच स्थानिक काजू पोफळी, माड इत्यादी फळझाडे लागवड केलेल्या बागायतदारांना देखील खतपुरवठ्यासाठी लेंडी पुरवली जाते. सुमित या बंदिस्त शेळी पालन शेडमध्ये दीडशे ते दोनशे शेळ्या आणि बोकड ठेवण्याचा कायम प्रयत्न करतो.
या माध्यमातून तयार झालेले बोकड मार्केटमध्ये विकली जातात व त्यानुसार सर्व माध्यमातून मिळणारी वार्षिक उलाढाल ही 50 लाख रुपयापर्यंत होते व त्यातून दहा ते बारा लाख रुपये निव्वळ नफा सुमितला मिळत आहे.