शेतकरी म्हटले म्हणजे कितीही प्रकारचे नैसर्गिक संकटे आली व त्यामुळे कितीही आर्थिक फटका बसला तरी देखील पुन्हा नव्या उमेदीने उभा राहतो व परत पुढच्या पिकाची तयारी करतो. हातात पैसा नसला तरी देखील कुठूनही पैसा उपलब्ध करून काळ्या आईची सेवा करण्यामध्ये शेतकरी राजा गुंग होत असतो.
नैसर्गिक आपत्तीमुळे कितीही आर्थिक नुकसान झाले तरी त्याचा विचार न करता मागचे सगळे विसरून जाऊन पुढच्याची तयारी करण्यामध्ये शेतकरी कायम व्यस्त असतात. तसेच परिस्थिती यावर्षी सगळ्या महाराष्ट्रावर असून दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतीमधील पिकांना पाण्याची खूप मोठ्या प्रमाणावर या वर्षी कमतरता भासली.
विहिरी तसेच बोरवेल कोरड्याठाक पडल्या. तसेच बऱ्याच ठिकाणी पिके जोमात असताना विहिरीने तळ गाठल्याने पाणी अपुरे पडायला लागले. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक जगवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागले. परंतु साक्री तालुक्यातील बेहेड या गावचे तरुण शेतकरी विशाल खैरनार यांनी मात्र धाडसाची परिसीमा गाठली व चक्क साडे तीन एकर टरबूज हे टँकरद्वारे विकतचे पाणी घेऊन जगवण्याचे धाडस केले.
विशाल खैरनार यांनी साडेतीन एकर क्षेत्रातील टरबूज जगवले टँकरच्या पाण्याने
याबाबत सविस्तर वृत्त असे की, साक्री तालुक्यात असलेल्या बेहेड या गावचे तरुण शेतकरी विशाल दिलीप खैरनार यांनी चक्क विकतचे पाणी टँकरद्वारे आणत साडेतीन एकर क्षेत्रातील टरबूज जगवण्याचे धाडस करून दाखवले असून टरबुजाचे उत्पादन देखील घेतले आहे.
यावर्षी विशाल खैरनार यांनी त्यांच्या शेतामध्ये 25 फेब्रुवारीला साडेतीन एकर क्षेत्रामध्ये जिग्ना गोल्ड, बाहुबली आणि अजित सीड्स टरबूज संकरित वाणांची लागवड केली होती. परंतु खैरनार यांच्या बेहड गावच्या परिसरामध्ये कायमच दुष्काळ सदृश्य परिस्थिती असते. त्यातल्या त्यात या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे या वर्षी परिस्थिती आणखीनच बिकट झाली.
जेव्हा खैरनार यांनी साडेतीन एकर क्षेत्रामध्ये टरबूज लागवड केली व लागवडीनंतर एकच महिन्यांमध्ये विहिरीतील पाणी अपूर्ण पडायला लागले. त्यामुळे पाण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी बोरवेल घेतले. परंतु ते देखील कोरडेच निघाले. परंतु न डगमगता या परिस्थितीला तोंड द्यायचे ठरवून त्यांनी चक्क टॅंकरने विकतचे पाणी आणण्याचे ठरवले व हे पाणी विहिरीत टाकून टरबूज पिकाला पाण्याची सोय केली.
तसे पाहायला गेले तर चक्क दीड महिन्यापर्यंत टँकरने पाणी पुरवणे हे व्यावहारिक दृष्टिकोनातून देखील मनाला न पटणारी गोष्ट होती. परंतु तरी देखील त्यांनी टरबूज जगवायचेच या इच्छेने 380 टँकर विकतचे पाणी टरबूज पिकाला दिले. म्हणजे हे पाणी यासाठी खर्च करत असताना मात्र बाजार भाव काय मिळेल याविषयी कुठल्याही प्रकारची काळजी त्यांनी केली नाही.
त्यानंतर टरबूज चे उत्पादन त्यांना मिळायला लागल्यानंतर सात ते आठ किलो वजनाचे एक एक टरबुजाचे उत्पादन त्यांना मिळाले. परंतु बाजारभाव मात्र साडेदहा रुपये प्रतिकिलो इतकाच मिळाला. टॅंकरने पाणी टाकण्यासाठी दोन लाख रुपये खर्च आला व इतर औषधे खत इत्यादी करिता तीन लाख रुपये खर्च करण्यात आला.
साडेतीन एकरमध्ये त्यांनी आठ लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. पण खर्च जास्त झाल्याने खर्च वजा करता फक्त एक लाख रुपये निव्वळ नफा त्यांना मिळाला. दोन लाख रुपयाचे नुसते विकतचे पाणी घ्यावे लागल्यामुळे तो खर्च वाढला व नफ्यातून दोन लाखांची घट झाली.
परंतु तरीदेखील हातात काहीच न राहण्यापेक्षा एक लाख रुपयाची कमाई त्यांनी धाडसाने केली. स्वतःच्या विहिरीमध्ये पाणी राहिले असते तर मात्र ते दोन लाख रुपये आणि आताचा एक लाख असा तीन लाख रुपये नफा त्यांना मिळाला असता.