Top Cow Breed In India:- भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायाला मोठे महत्त्व असून दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून हा व्यवसाय खूप महत्त्वपूर्ण असा आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून देखील पशुपालन व्यवसाय व त्या अनुषंगाने दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबवण्यात येतात.
दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून बघितले तर गाई व म्हशींचे पालन भारतात मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रामध्ये गाई सर्वात जास्त पाळल्या जातात व यामध्ये संकरित गाई व देशी गाईंचा समावेश होतो.
परंतु संकरित गाईंचे देशी गायींच्या तुलनेत दुधाचे उत्पादन जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर संकरित गाई पाळल्या जातात. परंतु देशी गाईंमध्ये देखील अशा काही गायींच्या जाती आहेत त्या संकरित गाईंच्या तुलनेत दूध उत्पादनाच्या बाबतीत सरस ठरू शकतील. त्यातील काही भारतातील महत्त्वाच्या टॉप अशा गाईंच्या जातींविषयीची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
भारतातील टॉप देशी गाईंच्या जाती
1- साहिवाल गाय– ही गाय प्रामुख्याने गुजरात राज्यामध्ये आढळून येते व उत्तर प्रदेश, राजस्थान तसेच गुजरात व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आढळते. अधिक दूध उत्पादनासाठी ही गाय शेतकऱ्यांमध्ये ओळखले जाते. साईवाल गाय सरासरी 15 ते 20 लिटर दूध देते. परंतु योग्य व्यवस्थापन ठेवले तर ती 40 ते 50 लिटर पर्यंत देखील दूध देऊ शकते.
या गायीच्या दुधामध्ये प्रथिन आणि चरबीचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येते. तसेच या गाईचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गाईत उष्णता सहन करण्याची क्षमता चांगली असते. अगदी उष्ण प्रदेशात देखील ही सहजपणे तग धरू शकते. विविध राज्यानुसार आपण साहिवाल गायची किंमत पाहिली तर ते 40,000 पासून तर एक लाख रुपयापर्यंत आहे.
2- गिर गाय– पशुपालकांमध्ये प्रसिद्ध असलेली देशी गाईची ही जात अधिकच्या दूध उत्पादनासाठी प्रामुख्याने ओळखली जाते. या गाईची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्यामुळे ती सहजासहजी आजारांना बळी पडत नाही.
ही गाय गडद लाल तपकिरी आणि पांढरी चमकदार रंगाची असते. या गाईची किंमत पाहिली तर ती गाईचे वय तसेच तिचे दूध उत्पादन क्षमता यानुसार ठरवली जाते. तरीही भारतामध्ये साधारणपणे गिर गाईची किंमत 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत असते.
3- राठी गाय– हे देखील जास्त दूध देणाऱ्या देशी जातींच्या गाईंपैकी एक जात असून त्या गाईला राजस्थानची कामधेनु असे देखील म्हणतात. ही गाय रोज सात ते बारा लिटर दूध देते व चांगली काळजी व आहार व्यवस्थापन योग्य ठेवले तर 18 लिटर पर्यंत दूध देते. राजस्थान राज्यातील गंगानगर, जैसलमेर आणि बिकानेर येथे राठी जातीच्या गाई मोठ्या प्रमाणावर पाळल्या जातात
या जातीच्या गायीचा रंग तपकिरी असतो व तिच्या अंगावर पांढरे ठिपके आढळून येतात. एका वर्षांमध्ये ही गाय 1560 लिटर व जास्तीत जास्त 2810 लिटर दूध देते. राठी गायीची किंमत दूध उत्पादन क्षमता व वय यावर प्रामुख्याने अवलंबून असते व साधारणपणे भारतामध्ये ही गाय वीस हजार रुपयांपासून साठ हजार रुपयापर्यंत मिळते.
4- थारपारकर गाय– ही गाय सर्वात जास्त दूध देणाऱ्या देशी गाईंच्या जातींमध्ये प्रामुख्याने ओळखले जाते. भारत पाकिस्तान सीमेवर पश्चिम राजस्थान आणि गुजरात मधील कच्छच्या रणमध्ये ही आढळून येते.
ही गाय दररोज 12 ते 16 लिटर दूध देते. या जातीची गाय पांढऱ्या व हलक्या तपकिरी रंगाची असते व डोके मध्यम आकाराचे, कपाळ रुंद आणि कान लांब व रुंद असतात. कानाची आतील त्वचा हलकी पिवळी असते व शेपूट लांब, पातळ असते. या गायची किंमत भारतात 20000 ते 60 हजार रुपये पर्यंत आहे.
5- लाल सिंधी गाय– लाल सिंधी गाय प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ मध्ये प्रामुख्याने आढळते. देशी गाईचे पालन करून तुम्हाला दूध व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही लाल सिंधी गाईचे पालन करू शकता. एनडीडीबीनुसार एका वेतात रेड सिंधी गाय 1840 लिटर ते कमाल 2600 लिटर दूध देऊ शकते.
या गाईचे शरीर गडद ते हलके लाल रंगाचे असते व कपाळावर पांढरे डाग ही दिसून येतात. या गाईच्या दुधात 5.2% पर्यंत फॅट आढळून येतो व दररोज ही गाय 12 ते 20 लिटर दूध देते. भारतामध्ये ही गाय वीस हजार ते 80 हजार रुपयांपर्यंत मिळते.