शासनाच्या अनुदानाचा लाभ घ्या आणि बांबू लागवड करा! कशी करावी बांबू लागवड आणि कोणत्या जाती आहेत फायद्याच्या?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेती पद्धती आणि शेतीमधील पिकांची लागवड यामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाले असून वेगवेगळ्या पिकांची लागवड आणि भरघोस उत्पादनाकरिता आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यातल्या त्यात अशा शेती पद्धतीला शासनाच्या अनेक योजनांचे पाठबळ त्यामुळे कृषी व्यवसाय आता खूप मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीमध्ये भाजीपाला पिकांची लागवड तसेच फुले शेती आणि फळबागा लागवड आता मोठ्या प्रमाणावर केल्या जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न देखील वाढताना दिसून येत आहे.

याच अनुषंगाने जर आपण बांबू लागवडीचा विचार केला तर बदलत्या हवामानामध्ये शाश्वत उत्पन्न देणारे पिक म्हणून बांबूकडे पाहिले जाते. तसेच आता बांबूचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी  होताना दिसून येत असून येणाऱ्या काळात इथेनॉलमध्ये देखील बांबू वापरला जाणार असल्यामुळे निश्चितच बांबूची मागणी वाढणार आहे. याकरता शासनाने देखील आता बांबू लागवडीकरिता शेतकऱ्यांना रोपांचा पुरवठा ते बांबूची लागवड अशा महत्त्वाच्या टप्प्यांकरिता अनुदान देण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतले आहे.

 कशी करावी बांबूची लागवड?

1- बांबू लागवडीसाठी लागणारी जमीन हवामान भारतातील ज्या भागांमध्ये वार्षिक सरासरी तापमान हे 8.8° डिग्री सेल्सिअस ते 36 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असते किंवा ज्या भागातच 70 ते 450 मिलिमीटर पाऊस पडतो अशा भागामध्ये हे पीक घेता येते. बांबूची लागवड करताना जास्त उताराची जमीन निवडू नये.

याकरिता सपाट व कमी उताराची जमीन फायद्याचे ठरते व अशा जमिनीमध्ये बांबूची लागवड केली तर उत्पादन वाढते.  खडकापासून बनलेली वालूकामय किंवा  चिकन ते चिकन पोयटा प्रकारची जमीन चांगली असते. अलीकडच्या कालावधीमध्ये बांबूचा समावेश आता गवत वर्ग पीक लागवडीमध्ये करण्यात आला असल्याने बांबूची लागवड शेतामध्ये किंवा बांधावरही करता येतो.

2- बांबूच्या या जाती आहेत फायदेशीर महाराष्ट्र मध्ये 121 बांबूच्या प्रजाती असून त्यापैकी माणगा,चिवा, चिवारी, मोठा बांबू तसेच पिवळा बांबू, मानगा, कळक इत्यादी जाती प्रामुख्याने कोकण भागात आढळून येतात. परंतु बांबूचे व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवडीचा विचार केला तर मानगा, मानवेल, कळक आणि मेस या जाती फायद्याच्या आहेत.

3- बांबू लागवड कधी आणि कशी करावी?- बांबूची लागवड प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये करता येते. परंतु जर पाण्याची सोय असेल तर नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये देखील लागवड करावी. बांबूच्या जर कमी व्यासाच्या जातींची निवड केली तर तीन बाय तीन मीटर, मध्यम व्यासाच्या जातींकरिता जसे की माणगा व मानवेल अशा जातींकरिता पाच बाय पाच मीटर, मोठा व्यासाच्या बांबू करीता सात बाय सात मीटर तर हेमिलटोनीकरिता दहा बाय दहा मीटर अंतराचे शिफारस आहे.

लागवड करताना प्रामुख्याने खड्डे खोदून त्या खड्ड्यांमध्ये पाच किलो कंपोस्ट किंवा गांडूळ खत, 100 ग्रॅम युरिया, 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 ग्रॅम मुरेट ऑफ पोटॅश मिसळून घ्यावे. त्यानंतर बांबूचे कंद, रोपे किंवा कंदकाठी खड्ड्याच्या मधोमध सरळ उभी करून तिला माती एका पेरापर्यंत घट्ट लावून घ्यावी. त्यानंतर बांबूच्या रोपाच्या आजूबाजूला माती पसरवून तिचे व्यवस्थित आच्छादन करून घ्यावे. त्यामध्ये रोपाच्या सभोवती पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

 कोणत्या ठिकाणी करावी बांबूची लागवड?

शेतीसाठी अयोग्य जमीन तसेच दुष्काळी भाग आणि पाणी साचत असेल अशा जमिनीमध्ये बांबूची लागवड करावी. तसेच परसबाग, शेतीचे बांध,  मृदा संवर्धनासाठी बांबूची लागवड शक्य आहे.

 बांबू चा उपयोग काय असतो?

बांबू हे कठीण, लवचिक आणि टिकाऊ असल्यामुळे व्यावसायिक उत्पन्नाच्या दृष्टीने फायदेशीर असून सुमारे 1500 कामाकरिता याचा उपयोग केला जातो. कृषी अवजारे तयार करणे तसेच घरांचे बांधकाम, हस्तकला उद्योग आणि पेपर निर्मिती उद्योगांमध्ये देखील बांबू वापरला जातो. लाकडाला उत्तम पर्याय म्हणून देखील बांबूकडे पाहिले जाते. फर्निचर तसेच पार्टिशन निर्मिती करिता बांबू वापरतात.

जर आपण राष्ट्रीय बांबू मिशनचा विचार केला तर देशामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड करण्याकरिता 17 प्रजातींची शिफारस करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही बांबूची लागवड केली तर यामध्ये अद्रक व हळद तसेच भाजीपाला पिकांची लागवड आंतरपीक म्हणून करू शकतात. तसेच बांबूपासून तुम्ही एखादा उद्योग उभारला तर तुम्हाला शासनाचे अनुदान देखील मिळू शकणार आहे. तसेच बांबूपासून इथेनॉल बनवता येत असल्यामुळे येणारा काळ हा बांबूच्या मागणीसाठी खूप उत्तम असणार आहे.