टोमॅटो प्लॉटची घ्या अशापद्धतीने काळजी आणि मिळवा टोमॅटोचे बंपर उत्पादन! वाचा तज्ञांचे मार्गदर्शन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कुठल्याही पिकापासून जर तुम्हाला भरघोस उत्पादन हवे असेल तर त्याकरिता तुम्हाला प्रत्येक बाजूने व्यवस्थित नियोजन आणि पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. पिकांचे नियोजन करताना त्याच्या लागवडी पूर्वीची तयारी तर थेट काढणीपर्यंत अनेक बारीक सारीक गोष्टींकडे खूप काळजीपूर्वक लक्ष पुरवणे गरजेचे असते. यामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाला खूप असे महत्त्व आहे.

कुठलाही पिकावर जर किडी व रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढला तर नक्कीच उत्पादनात घट संभवते. तसेच खत व्यवस्थापन देखील तितकेच महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण या लेखांमध्ये टोमॅटो पिकावरील कीड व रोग व्यवस्थापना बाबतीत संचालक( फलोत्पादन) डॉ.कैलास मोते यांनी दिलेली महत्त्वाची माहिती बघणार आहोत.

 टोमॅटो प्लॉटची अशापद्धतीने घ्या काळजी आणि मिळवा भरघोस उत्पादन

टोमॅटो पिकाचा जर एकंदरीत आपण विचार केला तर यामध्ये रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात झाला तर अनेक प्रकारच्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव टोमॅटोवर होतो व त्यानंतर नियंत्रण मिळवणे कठीण होते. त्यामुळे रोग येऊच नये याकरिता काही उपाय करणे खूप गरजेचे असते व यामुळे आपल्याला विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळता येणे शक्य होते. टोमॅटोवर सगळ्यात जास्त नुकसानकारक जर काही असेल तर ते विषाणूजन्य रोग आहेत.

त्यामुळे टोमॅटो पिकावर या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विषाणूजन्य रोगांना प्रतिकारक अशा टोमॅटोच्या वानाची निवड लागवडीकरिता करणे गरजेचे आहे. तसेच जर रोपवाटिकेतून रोपे घ्यायचे असतील तर ते परवानाधारक असलेल्या नर्सरीतूनच घेणे गरजेचे आहे.

ज्या नर्सरीमधून तुम्ही टोमॅटोची रोपे घेत आहात त्या नर्सरीला इन्सेक्ट नेट, विडमेट तसेच दोन दरवाजे पद्धत व रोपवाटिकेच्या नियमावलीप्रमाणे सर्व सुविधा आहेत का? हे देखील पाहणे तितकेच गरजेचे आहे. तसेच तुम्हाला ज्या नर्सरीमधून रोपे घ्यायचे आहेत त्या नर्सरी असलेल्या भागांमध्ये टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव तर झालेला नाही ना? हे बघूनच रोपांची खरेदी करावी.

 महत्त्वाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना

रोग येऊ नये याकरता काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे व याकरिता रोपवाटकेमध्ये बियाण्याची पेरणी केलेल्या गादीवाफ्यावर 60-100 मेष नायलॉन नेट किंवा पांढरे पातळ मलमल कापड दोन मीटर उंचीपर्यंत मच्छरदाणी सारखे लावून घ्यावे. यामुळे रोगांचा प्रसार करणाऱ्या ज्या काही हानिकारक किडी आहेत त्यापासून आपल्याला टोमॅटो पिकांचे संरक्षण करता येते. तसेच मावा, फुलकडे व पांढरी माशी सारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होणार नाही याकरिता काळजी घेणे गरजेचे असून याकरिता रोपांचे जेव्हा पुनरलागवड करायची असेल त्याकरिता 25 ते 30 दिवसांची रोपे पुरेसे हार्डनिंग करून वापरावे.

महत्वाचे म्हणजे जेव्हा रोपांची पुनर लागवड केली जाते तेव्हा वाफ्यावर प्लास्टिक पेपरचे आच्छादन केले तर पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहते. तुम्हाला ज्या शेतामध्ये टोमॅटो लागवड करायची आहे त्या अगोदर साधारणपणे 25 ते 30 दिवस आधी शेताच्या चारही बाजूने पाच ते सहा ओळी  मका किंवा ज्वारी किंवा बाजरी या सापळा पिकांची लागवड करून घ्यावी. त्यामुळे पांढरी माशी मोठ्या प्रमाणावर नियंत्रित करता येते.

तसेच रोपांची पुनरलागवड करण्याअगोदर इमिडाक्लोप्रीड(17.8 एस एल) चार मिली प्रति दहा लिटर पाणी या द्रावणामध्ये रोपांची मुळे दहा ते पंधरा मिनिटे बुडवून घ्यावीत व नंतर लागवड करावी. व्यवस्थापन करताना नत्रयुक्त खतांचा आधार जास्त वापर टाळावा व शिफारशी प्रमाणे खतांच्या मात्रा द्यावे.तसेच पाण्याचे व्यवस्थापन करताना जास्तीचे पाणी न देता पिकाला आवश्यकता किती आहे याचा व्यवस्थित अंदाज घेऊनच पाण्याचे व्यवस्थापन करावे.

तसेच पिके तनविरहित ठेवणे खूप गरजेचे आहे. तसेच एकाच क्षेत्रामध्ये टोमॅटोचे पीक न घेता पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे. तसेच रस शोषक किडींचे नियंत्रण करायचे असेल तर एका एकरासाठी तीस ते पस्तीस निळे व पिवळे चिकट सापळे शेतामध्ये लावून घ्यावेत. तसेच टोमॅटो वर नागअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो.

त्यामुळे या आळीच्या व्यवस्थापनाकरिता एका हेक्टर करिता 20 कामगंध जलसापळे म्हणजेच वॉटर ट्रॅप लावून घ्यावे. टोमॅटो पिकाची शेवटची तोडणी झाल्यानंतर झाडे उपटून ती नष्ट करून टाकावीत. जर रोगग्रस्त झालेली झाडे शेतामध्ये तसेच राहिले तर इतर लागवड केलेल्या टोमॅटो पिकावर किडींच्या माध्यमातून पुन्हा अटॅक होण्याचा संभव असतो व विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.

 रासायनिक नियंत्रण

1- पांढरी माशीचे नियंत्रण पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरिता इमिडाक्लोप्रिड(17.8 टक्के एस.एल तीन मिली किंवा स्पायरोमेसीफेन(22.10 टक्के  डब्ल्यू डब्ल्यू एस सी) बारा मिली किंवा थायमेथोक्साम( 25% डब्ल्यू जी ) चार ग्रॅम किंवा प्रॉपरगाईट( 50% ) अधिक बायफेनथ्रीन( पाच टक्के एस इ) 22 मिली प्रतिदहा लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून गरजेनुसार फवारणी करावी.

2- फुलकिडे नियंत्रण फुलकिड्यांच्या नियंत्रणाकरिता इमिडाक्लोप्रीड( 70 टक्के डब्ल्यू जी) दोन ग्रॅम किंवा सायेनटॅनिलीप्रोल(10.26 टक्के ओडी ) 18 मिली किंवा थायमेथॉग्जाम(12.60 टक्के) अधिक लांबडा सायकलोथ्रीन(9.50 टक्के झेड सी) अडीच मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारण्या कराव्यात.

3- मावा किडीच्या नियंत्रणाकरिता मावा किडीच्या नियंत्रणाकरिता सायनट्रेनीलीप्रोल(10.26 टक्के ओडी ) 18 मिली किंवा डायमीथोएट (30% ईसी) वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

4- नाग अळीच्या नियंत्रणाकरिता नागअळीच्या नियंत्रणाकरिता सायनट्रेनीलीप्रोल 10.26 ओडी 18 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

5- फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणाकरिता फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरॅनएनीलीप्रोल (१८.५० एससी) तीन मिली किंवा इंडोक्साकार्ब १४.५० एससी दहा मिली किंवा नोव्हॅलूरॉन (दहा ईसी)  10 मिली किंवा क्विनॉलफॉस (25 ईसी) वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून गरजेनुसार आलटून पालटून फवारण्या कराव्यात.

6- बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी व्हावा याकरिता मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा प्रोपीनॅब 30 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

( कुठलीही फवारणी करण्याआधी कृषी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)