कपाशीची पातेगळ आणि पाने लाल होण्यापासून कपाशीचा करा बचाव! या उपायोजना ठरतील फायद्याच्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कपाशी हे महाराष्ट्रातील खरीप हंगामातील एक प्रमुख पीक असून महाराष्ट्रातील बहुतेक भागांमध्ये कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित हे कपाशी पिकावर अवलंबून असल्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून या पिकाचे महत्त्व खूप आहे. जर आपण सध्याच्या कालावधीचा विचार केला तर हा कालावधी कपाशी पिकाला पाते आणि बोंडे लागण्याचा कालावधी आहे.

परंतु पावसाने खंड दिल्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नेमका अशाच कालावधीमध्ये कपाशी पिकाची पातेगळ मोठ्या प्रमाणावर होते. जर पातेगळ झाली तर उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर घट येण्याची शक्यता असते.

तसेच दुसरी बाब म्हणजे याच कालावधीमध्ये बऱ्याचदा कपाशीची पाने लाल पडतात व या विकृतीमुळे देखील पातेगळ मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे या लेखात आपण कपाशी पिकाची पातेगळ होऊ नये आणि कपाशीची पाने लाल पडू नयेत याकरिता महत्त्वाच्या उपाययोजना पाहणार आहोत.

 पातेगळ होऊ नये म्हणून करायच्या उपाययोजना

हवामानातील बदल आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर पातेगळ होत असते. तसेच कपाशीला पाण्याचा ताण पडला आणि ताण पडल्यानंतर जर  पाऊस पडला किंवा कपाशीच्या पिकाला पाणी दिले तरी स्ट्रोक बसण्याची शक्यता असते व यामुळे देखील पातेगळ होत असते.

त्यामुळे पातेगळ कमी करण्याकरिता नेपथलिक  ऍसिटिक ऍसिड अर्थात एनएए किंवा प्लॅनोफिक्स या संजीवकाची फवारणी करणे गरजेचे असते. याकरिता तुम्ही जर 15 लिटरचा पंप वापरत असाल तर तीन मिली प्लॅनोफिक्स टाकून तुम्ही फवारणी करू शकतात. यामुळे पातेगळ कमी होते व कपाशीच्या उत्पादनामध्ये दहा टक्क्यांची वाढ दिसून येते.

 लाल्या रोगाचे व्यवस्थापन

कपाशीला जेव्हा मोठ्या प्रमाणावर पाते आणि बोंडे लागण्याचा कालावधी असतो अगदी त्याच वेळेत कपाशीची पाने लाल पडायला लागतात. ही एक विकृती असून ती नत्राच्या कमतरतेमुळे तसेच तुडतुड्या सारख्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला तर दिसून येते. जमिनीमध्ये जर जास्त प्रमाणात ओलावा असेल किंवा खूपच जास्त प्रमाणात जमीन कोरडी झाले असेल तर अशा परिस्थितीमध्ये हा प्रकार दिसून येतो.

याकरिता नत्राची मात्रा व्यवस्थित देणे खूप गरजेचे आहे. म्हणून लागवडीच्या वेळी 20 टक्के नत्र, लागवडीनंतर 40% नत्र आणि तीस दिवसांनी उर्वरित 40 टक्के नत्र आणि लागवडीच्या साठ दिवसांनी 40 टक्के नत्र अशाप्रमाणे जर नियोजन केले तर खूप मोठा फायदा होतो.  जर बीटी वाणाची लागवड केली असेल तर नत्राची मात्रा 25% वाढवावी. तसेच मॅग्नेशियम सल्फेट 20 ते 30 किलो जमिनीतून द्यावे.

तसेच तुमच्या कपाशीच्या प्लॉटमध्ये जर कपाशीची पाने लाल होत असल्याचे दिसून येत असेल तर दोन टक्के डीएपी( दहा लिटर पाण्यात 200 ग्रॅम) पंधरा दिवसांच्या अंतराने दोन टप्प्यांमध्ये फवारणी करावी. असे व्यवस्थापन केल्यास लाल्या रोगाचा प्रादुर्भाव टाळता येतो. तसेच कपाशीचे जेव्हा तुम्ही निरीक्षण करतात व यावेळेस जर तुम्हाला अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर काही लक्षणे दिसून येत असतील तर त्यानुरूप उपाययोजना करणे गरजेचे आहे.

अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असेल अशा अन्नद्रव्याची फवारणी केल्यास देखील खूप मोठा फायदा मिळतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर नत्राची कमतरता झाली तर पाने पिवळी पडायला लागतात व झाडाची व मुळांची वाढ थांबते. हा प्रकार टाळण्याकरिता युरिया खताची एक टक्के मात्रा म्हणजेच दहा लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम युरिया टाकून त्याची फवारणी केली तर खूप मोठा फरक पडतो.