सध्या रब्बी हंगामातील म्हणजेच उन्हाळी कांद्याची काढणी सुरू असून लाल कांद्याच्या तुलनेमध्ये रब्बी हंगामातील कांद्याची टिकवणं क्षमता चांगली असते व त्यामुळे बाजारभाव जर कमी असेल तर बरेच शेतकरी कांदा न विकता तो चाळीत साठवण्याला प्राधान्य देतात.
बऱ्याचदा चाळीत व्यवस्थितरित्या साठवलेला कांदा देखील सडायला लागतो व मोठ्या प्रमाणावर कांद्याचे नुकसान होऊन आर्थिक फटका बसतो. याकरिता कांद्याच्या काढणीपासून ते चाळीत साठवण्यापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. साधारणपणे लागवड केल्यानंतर 110 ते 140 दिवसांमध्ये कांद्याचे पीक काढणीला तयार होते.
कांदा पक्व होतो तेव्हा त्याची नवीन पात येण्याची क्रिया थांबून पातीचा रंग पिवळा होतो व पातीचा भाग नरम होऊन आपोआप वाळतो आणि पात वाकते व यालाच आपण मान पडणे असे म्हणतो. जेव्हा कांद्याच्या एकूण क्षेत्रामध्ये 50% कांद्याच्या पाती पडतात तेव्हा कांदा काढणीला सुरुवात करणे गरजेचे असते.
त्यामुळे तुम्हाला देखील चाळीत कांदा साठवायचा असेल तर काढणी करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. जेणेकरून कांदा चाळीत पाच ते सहा महिन्यांपर्यंत खराब न होता दर्जेदार व उत्तम स्थितीत राहतो.
कांदा साठवण्यापूर्वी काढणी करताना या गोष्टींचे घ्या काळजी
1- काढणीनंतर पाती सोबत कांदा वाळवणे– कांदा काढणी केल्यानंतर कांद्याला शेतात पातीसह 3 ते पाच दिवस वाळवून घ्यावे. या कालावधीमध्ये कांद्याच्या पातीमध्ये तयार झालेले व साठवणुकीत कांद्याला सुक्तपणा देणारे जीवनसत्व पातीमधून कांद्यामध्ये उतरतात व त्यामुळे पात सुखेपर्यंत कांदा शेतात वाढवणे गरजेचे आहे. यामध्ये लक्षात ठेवावे की कांदा वाळवताना कांद्याचे ढीग करून ठेवू नये. जमिनीवर एकसारखे पसरवून कांदा वाळवावेत.
2- कांदा खांडताना कांद्याची मान ठेवून पात कापणे– कांद्याची पात चांगली वाळविल्यानंतर कांद्याच्या मानेला पीळ देऊन एक ते दीड इंच मान ठेवून कांद्याची पात कापावी. त्यामुळे साठवणुकीच्या काळामध्ये कांद्याचे तोंड बंद राहते व सूक्ष्मजीवांचा शिरकाव आतमध्ये होत नाही व त्यामुळे कांदा सडणे व कांद्यामधील पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्याच्या वजनात घट होणे इत्यादी समस्या निर्माण होत नाही.
3- तीन आठवडे सावलीमध्ये वाळवणे– या कालावधीमध्ये कांद्यामध्ये जे काही उष्णता साठलेली असते ती हळूहळू बाहेर पडण्यास मदत होते व कांद्याच्या बाहेरील सालीमध्ये जे काही पाणी असते ते पूर्णपणे आटते व त्याचे पापुद्रात रूपांतर होते. त्याला आपण कांद्याची पत्ती असं देखील म्हणतो.
हीच पत्ती चाळीमध्ये कांद्याचे होऊ शकणाऱ्या नुकसानीपासून बचाव करते. तसेच तीन आठवड्यांपर्यंत सावलीत कांदा वाळवल्यामुळे त्यातील अतिरिक्त उष्णता व पाणी निघून गेल्यामुळे कांदा सडत नाही व कांद्याच्या सभोवती पापुद्रा म्हणजेच पत्तीचे आवरण तयार झाल्यामुळे वातावरणातील आद्रता व रोग किडींपासून त्याचा बचाव होतो.
तसेच बाष्पीभवन रोखले गेल्यामुळे साठवणुकीच्या कालावधीत वजनातील घट थांबते. तसेच श्वसनाची क्रिया मंदावते व त्यामुळे कांदा सुप्त अवस्थेत जातो व किमान चार ते पाच महिने कांद्याला मोड देखील येत नाही. त्यामुळे कांदा साठवणुकीच्या आधी सावलीमध्ये पातळ थर देऊन 21 दिवसांपर्यंत वाळवणे अत्यंत गरजेचे आहे.
4- साठवण्यासाठी अशाप्रकारे कांद्याचे प्रतवारी करावी– कांदा 21 दिवस चांगला वाळवल्यानंतर त्याची प्रतवारी करणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही कांद्याची प्रतवारी कराल तेव्हा आकाराने एकदम लहान किंवा एकदम मोठे कांदे,
जोड कांदे तसेच मोड फुटलेले व सडलेले तसेच मोड आलेले कांदे निवडून बाजूला काढून घ्यावेत. साठवण्यासाठी फक्त साडेचार ते साडेसात सेंटीमीटर व्यास असलेले म्हणजेच मध्यम आकाराचे एकसारखे कांदे निवडावे.