खरीप हंगामामध्ये कपाशी या पिकासोबत सोयाबीनची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते व गेल्या काही वर्षापासून सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र महाराष्ट्रात वाढत असून त्यासोबत भारतात देखील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन लागवड केली जाते.
भारतामध्ये सोयाबीन पिकाखालील क्षेत्रामध्ये महाराष्ट्रानंतर मध्यप्रदेश राज्याचा क्रमांक लागतो. त्यामुळे खरीप हंगामातील या महत्त्वाच्या पिकापासून भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी व्यवस्थापनाच्या बरोबरीनेच दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असे वाण लागवडीसाठी निवडणे खूप गरजेचे असते.
भारतीय कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता देशातील विविध कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन केंद्रांनी खूप मोलाची भूमिका पार पाडली असून दर्जेदार व चांगल्या उत्पादनक्षम व्हरायटी विकसित करण्यामध्ये कृषी विद्यापीठे कायम पुढे राहिलेले आहेत. अगदी याच पद्धतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला विद्यापीठाच्या अमरावती येथील संशोधन केंद्राने सहा वाण प्रसारित केले असून त्यातील दोन महत्त्वाच्या वाणाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
ही आहेत सोयाबीनचे चांगले उत्पादन देणारे वाण
1- एएमएस– एमबी 5-18( सुवर्ण सोया)- हा सोयाबीनचा वाण सोयाबीनच्या भरघोस उत्पादनासाठी खूप महत्त्वाचा असून सोयाबीन वरील खोडकुज/ मुळकुज या रोगांना चांगला प्रतिकारक्षम वाण आहे व अनेक बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार जास्त असलेल्या भागांमध्ये हा वाण लागवडीसाठी फायद्याचा आहे. सुवर्णा सोया या वाणाच्या सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे याच्या शेंगा आणि झाडांवर लव असते व त्यामुळे येणाऱ्या किडीला प्रतिरोध होतो.
या वाणाच्या उत्पादनाच्या संदर्भात केल्या गेलेल्या प्रात्यक्षिकांमध्ये सध्या प्रचलित असलेल्या वानांच्या तुलनेत 22 टक्के जास्त उत्पादकता नोंदवण्यात आलेली आहे.इतर वानांपेक्षा शेंगांची संख्या जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हे विशेष लोकप्रिय आहे. सोयाबीनचा हा वाण राष्ट्रीय स्तरावर मध्य प्रदेश,
महाराष्ट्र तसेच राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेश राज्यांकरिता 2019 मध्ये प्रसारित करण्यात आला व त्याचे अधिसूचना 2021 मध्ये निघाली.हा वाण चक्रभुंगा व खोडमाशी या किडींना देखील मध्यम प्रतिकारक असून पानांवरील बुरशीजन्य ठिपके रोगाला देखील प्रतिकारक आहे. लागवडीनंतर साधारणपणे 98 ते 102 दिवसात काढणीस तयार होतो व याची सरासरी उत्पादकता हेक्टरी 24 ते 28 क्विंटल इतकी आहे.
2- पीडीकेव्ही येलो गोल्ड– ज्या ठिकाणी निश्चित ते मध्यम पाऊस पडतो अशा भागामध्ये उत्तम निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठी फायद्याचा असून अशा जमिनीत लागवड केल्यास इतर वानांपेक्षा जास्त उत्पादन देतो. खास करून बुलढाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यांमध्ये या वाणाला खूप मागणी असून केलेल्या प्रात्यक्षिकांमध्ये इतर वाणापेक्षा 20% जास्त उत्पादन या वाणापासून मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे.
हा वाण लागवडीनंतर 95 ते 100 दिवसात काढणीस येतो व यापासून हेक्टरी सरासरी उत्पादकता 22 ते 26 क्विंटल पर्यंत मिळते. सोयाबीनचा हा वाण मूळकूज व पिवळा मोझॅक या रोगांना मध्यम प्रतिकारक आहे व चक्रभुंगा व खोदमाशी सारख्या किडींना देखील मध्यम प्रतिकारक आहे. महत्वाचे म्हणजे परिपक्व झाल्यानंतर दहा दिवसांपर्यंत याच्या शेंगा फुटत नाहीत.