पदवीधर अमोलने नोकरी न करता धरली शेतीची कास! सातत्यपूर्ण टोमॅटो शेतीतून एकरी घेतले 5 लाखापर्यंत उत्पादन, वाचा भाजीपाला शेतीचे नियोजन

tommato farming

शेती ही परवडणारी नाही ही संकल्पना जी काही आजकालच्या तरुणांमध्ये होती ती आता मागे पडत चालली असून शेतीमध्ये देखील उच्च पातळीचे तंत्रज्ञान आल्यामुळे आता या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक तरुण शेतकरी वैशिष्ट्येपूर्ण आणि वेगळ्या पद्धतीने शेती करताना दिसून येत असून अनेक प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती देखील शेतीतून लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहे.

असे तरुण शेतकरी आता पारंपारिक पिकांना फाटा देत  प्रामुख्याने फळबाग लागवड आणि विविध भाजीपाला पिकांची लागवड व त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन लाखोत उत्पादन घेत आहेत.

याच मुद्याला धरून जर आपण आष्टा येथील अमोल देसाई या पदवीधर असलेल्या तरुण शेतकऱ्याचा विचार केला तर त्यांनी टोमॅटो शेतीमध्ये सातत्य ठेवलेच आहे परंतु इतर भाजीपाला पिकांचे उत्पादन घेऊन लाखो रुपये कमाई करण्याची किमया देखील साध्य केली आहे.

 भाजीपाला टोमॅटो शेतीतून लाखोत उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आष्टा येथील अमोल लालासाहेब देसाई त्यांनी टोमॅटो शेतीमध्ये सातत्य ठेवले असून एकरी सरासरी पाच लाख रुपयापर्यंत उत्पादन घेण्याची किमया साध्य करून इतर शेतकऱ्यांपुढे एक प्रेरणा व आदर्श देखील निर्माण केलेला आहे. अमोल यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर ते पदवीधर आहेत.

परंतु नोकरीच्या मागे न लागता उत्तम अशी शेती करावी याकरिता त्यांनी शेतीत पाऊल ठेवले व भाजीपाला पिकातून उत्तम आर्थिक प्रगती साधली. त्यांची घरची चार एकर शेती व त्यासोबत इतर शेतकऱ्यांची शेती त्यांनी भाडेतत्त्वाने कसण्यासाठी घेतली आहे व यामध्ये एक एकर क्षेत्रामध्ये ऊस, दोन एकर क्षेत्रामध्ये काकडी तसेच सव्वा एकर मध्ये केळी व कोबी तसेच फ्लावर व एक एकर टोमॅटो अशा पद्धतीने त्यांचे एकंदरीत भाजीपाला पिकांचे नियोजन आहे.

या सर्व क्षेत्रातील भाजीपाला पिकांना पाण्याचे योग्य व्यवस्थापनासाठी त्यांनी विहीर आणि बोअरिंगची मदत घेतली असून त्या माध्यमातून त्याने व्यवस्थित पाणी व्यवस्थापन करतात. यावर्षी त्यांनी 30 गुंठे क्षेत्रामध्ये टोमॅटो लागवड करण्याचा निर्णय घेतला व याकरिता त्यांनी उभी व आडवी नांगरट करून शेणखत तसेच कंपोस्ट खत घालून जमीन व्यवस्थित तयार करून सऱ्या घेतल्या व 25 फेब्रुवारी रोजी मल्चिंग पेपर अंथरूण त्यावर झिगझ्याग पद्धतीने अथर्व या टोमॅटोच्या वाणाची लागवड केली.

टोमॅटोच्या रोपांना भक्कम आधार मिळावा म्हणून तार व काठीचा वापर केला. ठिबकचा दुहेरी वापर करताना त्यांनी पाणी व्यवस्थापन व त्या माध्यमातून पाण्यात विद्राव्य खतांचा पुरवठा देखील ठिबकचा वापर करून केला. गरजेनुसार कीटकनाशके फवारणीचे नियोजन त्यांनी योग्य ठेवले व त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून लागवडीनंतर 65 ते 70 दिवसानंतर त्यांची टोमॅटो काढणी सुरू झाला आहे. टोमॅटोचा प्लॉट एकदा काढायला सुरुवात झाल्यानंतर तो दीड ते दोन महिने चालतो.

सध्या आठ ते दहा तोडे टोमॅटो काढणीचे झाले असून सध्या दहा किलो टोमॅटोच्या क्रेटला दीडशे ते दोनशे रुपयांचा दर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळ्यामध्ये थोडे कमी उत्पादन मिळते. परंतु तरी देखील 30 गुंठा मध्ये चार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज अमोल यांना आहे.

अमोल गेल्या सहा वर्षापासून टोमॅटोची लागवड करत असून मागच्या वर्षी दोन एकरमध्ये त्यांनी 70 ते 80 टनापर्यंत टोमॅटोचे उत्पादन घेतले होते व मागच्या वर्षी टोमॅटोला असलेल्या उच्चांकी दराचा फायदा त्यांना झाला व त्या माध्यमातून त्यांना 20 ते 25 लाखांचे उत्पन्न मिळाले होते.

अशाप्रकारे आधुनिक पद्धतीने शेती केली तर तिथून देखील लाखो रुपये मिळवता येतात हे अमोल देसाई यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.