Banglore Marigold Cultivation:- शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोन आला असून उदरनिर्वाह पूरती शेती ही जी काही शेतीची ओळख होती ती आता या व्यावसायिक दृष्टिकोनामुळे कधीच मागे पडली आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे शेतीमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाचे वारे वाहायला लागले असून परंपरागत पिकांची जागा आता वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची लागवड तसेच फळपीके व फुल पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेऊ लागले आहेत.
त्यासोबतच दुसरे महत्त्वाचे म्हणजे कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊन लाखोत नफा मिळवण्याची किमया देखील शेतकऱ्यांनी आता विविध टेक्निक च्या माध्यमातून साध्य केलेली आहे. बाजारपेठेची मागणी आणि योग्य टायमिंग साधून देखील काही पिकांची लागवड शेतकरी करतात व कमी कालावधीतच चांगला दर मिळवून कमी क्षेत्रात देखील लाखोत उत्पन्न मिळवतात.
बाजारपेठेतील मागणी आणि योग्य टायमिंगच्या बाबतीत जर आपण झेंडू या फुल पिकाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या फुलाला दिवाळी आणि दसरा या सणांच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे या सणांचा कालावधींचा टाइमिंग साधून अनेक शेतकरी झेंडूची लागवड करतात व चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळवतात.
यावर्षी दसऱ्यापेक्षा दिवाळी मध्ये झेंडूच्या फुलांचे दर चांगले असल्याने अनेक शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक उत्पन्न मिळाले. त्यामुळे काही पिकांसाठी टायमिंग खूप महत्त्वाचा असतो.
असाच काहीसा टायमिंग साधत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या साकुर येथील प्रगतिशील शेतकरी उत्तमराव सहाणे यांनी बेंगलोर झेंडूच्या अक्षदा येलो या वाणाची लागवड करत लाखोत उत्पन्न मिळवले आहे. त्यांनी नेमके कशाप्रकारे या झेंडूच्या वाणाचे नियोजन केले ते आपण बघणार आहोत.
उत्तमरावांनी बेंगलोर झेंडूच्या अक्षदा येलो वाणाची लागवड केली यशस्वी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नासिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या साकुर या गावचे प्रगतिशील शेतकरी उत्तमराव सहाने यांनी दिवाळी आणि दसरा या सणांचा योग्य कालावधी साधून यावर्षी एक एकर क्षेत्रामध्ये बेंगलोर झेंडूच्या अक्षदा येलो या वाणाची लागवड केलेली होती. याकरिता त्यांनी रोपवाटिकेतून रोपे विकत आणली व दसरा व दिवाळीमध्ये फुले मार्केटमध्ये येतील अशा बेताने लागवड केली.
दिवाळी व दसऱ्याच्या कालावधीत झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते व व्यापारी देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. त्यांनी या बेंगलोर झेंडूचे अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले व साधारण 30 ग्रॅम वजनाची फुले असून आकर्षक अशा फुलांचे उत्पादन त्यांनी घेतले. बेंगलोर झेंडूच्या अक्षदा येलो या वाणाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पाऊस जास्त झाला तरी तग धरण्याची क्षमता यात आहे.
तसेच करपा रोगाला देखील सहनशील असे हे वाण आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका म्हटले म्हणजे मोठ्या प्रमाणावर भात शेती या ठिकाणी केली जाते. परंतु आता या ठिकाणाच्या शेतकऱ्यांनी देखील शेतीमधील बदल स्वीकारला असून वेगवेगळ्या पिकांसोबत मागील वर्षापासून फुलशेती देखील मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.
त्या ठिकाणी प्रामुख्याने बेंगलोर झेंडूला प्राधान्य दिले जात असून अक्षदा येलो वाण हा एक फायदेशीर ठरताना दिसून येत आहे. उत्तमरावांना या झेंडूच्या अक्षदा येलो वाणापासून एका एकरमध्ये जवळपास दसरा व दिवाळीच्या कालावधीत मिळून तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
अजून झेंडूच्या फुलांचे उत्पादन चालू असून अजून त्यातून पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा देखील उत्तमरावांना आहे.त्यामुळे यावर्षीची दिवाळी झेंडू फुलांच्या निमित्ताने उत्तमरावांच्या आयुष्यामध्ये एक समाधान व आनंदाचा सुगंध दरवळणारी ठरली हे मात्र निश्चित.