Wheat Farming : गव्हाच्या पिकात असं करा आंतरमशागत आणि खत व्यवस्थापन ; उत्पादनात होणार भरीव वाढ

Wheat Farming : सध्या देशात रब्बी हंगाम सुरू आहे. या हंगामात शेतकरी बांधवांनी गहू, हरभरा, जवस यांसारख्या पिकांची शेती सुरू केली आहे. गव्हाची लागवड महाराष्ट्रसमवेत संपूर्ण भारतात केली जाते. राज्यातील बहुतांशी भागात गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. वेळेवर तसेच उशिरा गहू पेरणी आटोपली आहे. दरम्यान आता शेतकरी बांधव पीक व्यवस्थापनाची कामे करीत आहेत.

गव्हाच्या पिकात आंतरमशागतीचे आणि खतांचे योग्य व्यवस्थापन केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. जाणकार देखील असेचं मत व्यक्त करत आहेत. यामुळे आज आपण गहू पिकात आंतरशागतीची कामे कशा पद्धतीने केली पाहिजे तसेच खत व्यवस्थापन कसे केले पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशा पद्धतीने करा आंतरमशागत आणि खत व्यवस्थापण 

जाणकार लोकांच्या मते, गहू पेरणी नंतर २१ ते ३० दिवसांनी एक खुरपणी आणि कोळपणी केली पाहिजे. यामुळे तण नियंत्रण व्यवस्थितरित्या होते. 

गव्हात चांदवेल, हराळी यांसारख्या तणांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. या तनांचे व्यवस्थापन करण्यासाठी तसेच नियंत्रणासाठी गरजेनुसार शेतकऱ्यांनी एक किंवा दोन खुरपणी किंवा निंदनी केली पाहिजे.

तसेच कोळपणी करून जमीन मोकळी केली पाहिजे. जेणेकरून पिकात हवा चांगली मोकळी फिरेल, पीक वाढीसाठी मदत होईल. आंतरमशागतीमुळे तणांचे नियंत्रण व्यवस्थित रित्या केल्या जाऊ शकते तसेच यामुळे जमिनीत ओलावा देखील टिकून रहात असल्याचा दावा केला जातो.

कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते, खुरपणी झाल्यानंतर शिफारशीत मात्रेपैकी उर्वरित नत्राची मात्रा दिली गेली पाहिजे. बागायती भागात वेळेवर पेरलेल्या गव्हास खुरपणी झाल्यानंतर म्हणजे पेरणी झाल्यानंतर २१-३० दिवसांनी प्रती हेक्टरी ६० किलो नत्र म्हणजे १३० किलो युरिया दिला पाहिजे. तसेच बागायती भागात उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकासाठी प्रती हेक्टरी ४० किलो नत्र म्हणजे ८७ किलो युरिया पेरणीनंतर 21 ते 30 दिवसांनी द्यावा.

तसेच गव्हाचे पीक ५५ ते ७० दिवसांचे झाले की १९:१९:१९ या विद्राव्य खताची फवारणी केली पाहिजे. १० लिटर पाण्यात २०० ग्रॅम १९:१९:१९ याप्रमाणे घेऊन दोन वेळा फवारणी करावी. यामुळे पीक वाढीस मदत होते.

यामुळे उत्पादनात देखील भरीव वाढ होत असते. याशिवाय दाणे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची फवारणी करण्याचा सल्ला जाणकारांकडून देण्यात येतो म्हणजे १०लि.

पाण्यात २०० ग्रॅम युरिया फवारणी दाणे भरण्याच्या अवस्थेत केली पाहिजे. निश्चितच अशा पद्धतीने आंतरमशागतीचे आणि खतांचे व्यवस्थापन केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते. यासाठी तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घेणे मात्र अनिवार्य राहणार आहे.