file photo

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :-  गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेवर फार मोठा परिणाम झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचे देखील नियोजन कोलमडले आहे. यातच सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे, मात्र ऑनलाईन शिक्षणाला सध्या मोबाईलचे कमकुवत नेटवर्क अडथळ्याचा विषय ठरतो आहे.

यामुळे राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली. यानंतर जेमतेम दोन महिने देखील शाळा सुरु राहिल्या नाही.

तोच करोनाची दुसरी महाभयंकर लाट आली. त्यामुळे शाळा बंद कराव्या लागल्या. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केला. आपली पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पालकांनी देखील आपल्या पाल्याना महागडे मोबाईल खरेदी करून दिले.

आता आपल्याला मोबाईल वरुन अभ्यास करता येईल, म्हणून मुलं सुखावली. परंतू झाले मात्र उलटेच! शहरी भाग सोडला तर वाड्यावस्त्यावर मोबाईल नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने शेकडो विद्यार्थी यापासून वंचित राहिले. अभ्यासक्रमाऐवजी मुले मोबाईलवर गेमच जास्त खेळू लागले.

हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्षकांकडे तक्रार केली. मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळावे, यासाठी आमचा देखील आटापिटा सुरु आहे. आम्ही रोज ऑनलाईन वेगवेगळ्या विषयांच्या तासिका घेत आहोत. मुलांचा अभ्यास घेत आहोत.

पण अनेक ठिकाणी नेटवर्क मिळत नसल्याने मुलांना यापासून वंचित रहावे लागत आहे. याला आमचाही नाईलाज आहे. असे शिक्षक म्हणू लागले आहे यामुळे पालक हाताश झाले आहेत. शिक्षणाचा हा तिढा सोडवायचा कसा? हा आता सर्वांसमोर मोठा प्रश्न निर्माण होऊन बसला आहे.