अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन निर्बंधांमध्ये शासनाने सूट दिल्यानंतर आता सर्व काही सुरळीत सुरु झाले आहे. मात्र अद्याप सर्व मंदिरे बंदच ठेवली आहेत.

करोना काय फक्त मंदिरातून वाढणार आहे काय ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आघाडी सरकार भक्तांच्या भावनांशी खेळत आहेत. सर्व देव देवता हे हिंदूंची शक्ती स्थळे आहेत.

भगवंताने मुख्यमंत्री व सर्व मंत्रींना सर्व मंदिरे उघडण्याची सद् बुद्धी द्यावी, यासाठी शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये महाआरती केली आहे.

जर येत्या १० दिवसात राज्य सरकारने सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली न केल्यास शहरात उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मंदिर बचाओ कृती समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते वसंत लोढा यांनी दिला आहे.

राज्यासह जिल्ह्यातील सर्व मंदिरे बंद असल्याच्या निषेधार्थ नगर मंदिर बचाओ कृती समितीच्यावतीने आज सकाळी शहरातील विविध भागातील मंदिरे उघडून घंटानाद व महाआरती करण्यात आल्या.

जयघोषाच्या घोषणा देत शहरातील ५ मंदिरांची दारे उघडण्यात आली. यात गांधी मैदान येथील मार्कंडेय मंदिर, गौरीशंकर मित्र मंडळाचे तुळजाभवानी माता मंदिर,

सर्जेपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, दिल्लीगेट येथील शनी मारुती मंदिर व जेलरोड वरील तुळजाभवानी माता मंदिर आदी ठिकाणी महाआरती करण्यात आल्या.