अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- नगर-औरंगाबाद रोडवर नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात सोमवारी झालेल्या विचित्र अपघातात सात चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी पोलीस पथकाने तात्काळ दाखल होत वाहतूक सुरळीत केली.

या अपघातातील एक वाहन तर अक्षरशः दुभाजकावर चढून उलटून शेजारच्या दुकानात जाता जाता राहिले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

यावेळी जमलेल्या नेवासा फाटा येथील व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी रस्तादुभाजक त्वरित काढण्यात यावे अशी मागणी करून संताप व्यक्त केला.

काही दिवसांपुर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने नेवासा फाटा येथे रस्त्याच्या मधोमध दुभाजक बसविले आहेत. आधीच अरुंद रस्ता, मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण आणि त्यातच आता नव्याने बसवलेले रस्ता दुभाजक यामुळे वाहनधारकांना रात्रीच्या वेळी वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.

त्यामुळे व्यावसायिक आणि नागरिकांनी रस्ता दुभाजक बसवायलाच विरोध केला होता. परंतु त्या विरोधाला न जुमानता रस्ता दुभाजक बसविण्यात आले आणि अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे आता हे दुभाजक काढण्यात यावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिकांनी केली आहे.