बळीराजाच्या चिंतेत भर ! शेतात वन्य प्राण्यांचा धुडगूस; पिकांचे मोठे नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  राहाता परिसरात हरिण, रानडुक्करे, काळवीट या वन्य प्राण्यांनी सोयाबीन, घास, मका, फळबागा या पिकांची नुकसान करून धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. तरी वनविभागाने पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतामध्ये खडा पहारा द्यावा लागत आहे. रात्रीच्या वेळेस रानडुकरे शेतामध्ये शिरून पिकांचे नुकसान करीत आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांवर हल्लेसुद्धा होण्याच्या घटना वाढल्या आहेत.

पिकांचे मोठे नुकसान राहाता तालुक्यात एकरुखे, नपावाडी, रामपूरवाडी, पिंपळवाडी, जळगाव, पुणतांबा याबरोबरच राहाता शहराच्या पूर्व भागात हे वन्यप्राणी सोयाबीन, मका, घास, डाळिंब, आंबा, पेरू, चिकू, सीताफळ व इतर सर्वच शेतातील छोट्या पिकांचे शेंडे खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.

काळवीट व रानडुकरे त्यांच्या डोक्याच्या साहय्याने शेतात लावलेली छोटी फळबाग यांची मोडतोड करत आहेत. वन्य प्राण्यांच्या वावरामुळे चालू वर्षाच्या हंगामातील पीक उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. या प्रकरणी वनविभागाने शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

नैसर्गिक शेतीवर ७० टक्के शेतकरी बांधवांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. आता वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी हतबल झाला आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.