टायगर ग्रुपच्या अहमदनगर शाखेने महाडच्या पूरग्रस्तांना पोहचवली जीवनावश्यक मदत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-  टायगर ग्रुप अहमदनगर जिल्हाच्या वतीने कोकणच्या महाड येथील पूरग्रस्तांना अन्न-धान्य, किराणा साहित्य व विविध जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली.

टायगर ग्रुपचे राज्य अध्यक्ष पै. तानाजी जाधव व अहमदनगर जिल्हाध्यक्ष पै. बंटी भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मदत टायगर ग्रुपच्या सदस्यांनी महाड येथे जाऊन पूरग्रस्तांना पोहच केली. टायगर ग्रुपच्या वतीने नुकतीच शहरातून पूरग्रस्तांसाठी मदत पाठविण्यात आली होती.

टायगर ग्रुपच्या युवकांनी सर्वाधिक पूराचा फटका बसलेल्या महाड येथील विविध गावोगावी जाऊन उत्कृष्टपणे नियोजन करून, पूरग्रस्तांना मदत पोहचवली. भर पावसात टायगर ग्रुपचे मदत पोहचविण्याचे कार्य सुरु होते. जीवनावश्यक मदत मिळाल्याचे समाधान पूरग्रस्तांच्या चेहर्यावर होते.

टायगर ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती पै. बंटी भिंगारदिवे यांनी दिली. महाडला मदत पोहचविण्यासाठी टायगर ग्रुपचे लोणी प्रवराचे अध्यक्ष पै. आण्णा ब्राम्हणे, केडगाव अध्यक्ष सोमा भोजने, प्रफुल ठोंबरे, सूर्या जाधव, कृष्णा दांगडे, प्रतिक गायकवाड, तुषार शिंदे, रोहित ब्राम्हणे, भैय्या थोरात यांनी परिश्रम घेतले.