अहमदनगर ब्रेकिंग : सिव्हिल हॉस्पिटलमधून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी फरार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांची ६ एप्रिल रोजी हत्या करण्यात आली होती. त्या हत्याकांडातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हा आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी नगर येथील जिल्हा रुग्णालयातून उपचार सुरू असताना पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेल्याची घटना घडली.

या घटनेने पोलिस प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली. राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे ६ एप्रिल रोजी अपहरण करून त्यांची निर्घृणपणे खुण केल्याची घटना घडली होती.

या घटनेतील आरोपी लाल्या ऊर्फ अर्जून विक्रम माळी, तौफिक मुक्तार शेख, अक्षय कुलथे तसेच मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे यांना एकएक करून अटक करण्यात आली होती. सदर चारही आरोपी राहुरी येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत जेरबंद होते.

दरम्यान कान्हू गंगाराम मोरे हा कोरोना बाधीत झाल्याने त्याला १६ ऑगस्ट रोजी उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती. तसेच त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मात्र आज दिनांक २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान आरोपी कान्हू गंगाराम मोरे हा पोलिसांना गुंगारा देऊन रूग्णालयातून पसार झालाय. या घटनेमुळे पोलिस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. पोलिस पथके त्याचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.

पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याकांडातील चार आरोपी हे गजाआड करण्यात आले होते. या घटनेतील आरोपी अनिल गावडे हा अद्याप पसार आहे. पोलिस प्रशासन त्याचा शोध घेण्यास असमर्थ ठरत आहेत. अशातच कान्हू गंगाराम मोरे हा आरोपी रूग्णालयातून पसार झालाय.

त्यामुळे पोलिस प्रशासन काय करते. कान्हू मोरे हा स्वतः पसार झाला कि त्याला कोणी पळून जाण्यास मदत केली. असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.