अहमदनगर ब्रेकिंग : 11 कोटींच्या अपहारप्रकरणी दोघांना अटक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- श्रीरामपूर येथील परळी पिपल्स मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या 11 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिरूर व मुंबई येथून या दोघांना अटक केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांनी दिली. विश्वजित राजेसाहेब ठोंबरे व प्रमोद खेडकर अशी आरोपींची नावे आहेत.

परळी पिपल्स सोसायटीच्या श्रीरामपूर शाखेत ठेवलेल्या ठेवी परत न मिळाल्याने ठेवीदाराने पोलिसांत फिर्याद दिली होती. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने केला. या प्रकरणात पूर्वी अमित गोडसे याला अटक झालेली आहे.

सोसायटीने ठेवीदारांकडून 11 कोटींच्या ठेवी गोळा केल्या होत्या. मात्र, त्या पैशांचा योग्य विनियोग न झाल्याने सोसायटी डबघाईला आली. परिणामी, ठेवीदारांना ठेवी परत मिळाल्या नाहीत.

आर्थिक गुन्हे शाखेने याचा सखोल तपास केल्यानंतर यातील दोषी असलेल्यांवर कारवाई केली आहे.सोसायटीचा जनरल मॅनेजर ठोंबरे याला मुंबईतून अटक करण्यात आली. तर प्रमोद खेडकर याला शिरूरमधून अटक करण्यात आली आहे.

या सोसायटीच्या श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, शेवगावसह जिह्यात पाच शाखा होत्या. पूर्वी परळी येथे मुख्यालय होते, नंतर नेवासा येथे मुख्यालय झाले होते. ठेवीदारांच्या तक्रारीनंतर झालेल्या लेखापरीक्षणात दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात आली आहे.