अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- अंगणवाडी सेविकांना शासनाच्या वतीने शालेय पोषण अभियान अंतर्गत शासकीय कामांसाठी मोबाईल देण्यात आले. मात्र, हे मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचं समोर आलंय.

त्यामुळे त्रस्त झालेल्या श्रीगोंदा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी सामूहिकरीत्या मोबाईल वापसी आंदोलन केले. सन २०१९मध्ये अंगणवाडी सेविकांना शासनाने पोषण अभियानासाठी मोबाईल पुरविले होते. त्यांची मुदत संपली आहे.

त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या प्रकल्पात जाऊन मोबाईल परत करण्याचे आंदोलन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वाखाली सुरू केले आहे.

शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या मोबाईलचा वापर अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांची नावे, हजेरी, वजन, उंची, गर्भवती माता, पोषण आहाराचे वाटप आदी माहिती भरण्यासाठी करतात.

मात्र, या मोबाईलची क्षमता (रॅम) कमी असल्याने ते वारंवार हँग होतात. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना काम करणे कठीण झाले होते.

जोपर्यंत शासन चांगल्या प्रतीचे मोबाईल देत नाही व मराठी भाषेतून ही सुविधा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असे श्रीगोंदा तालुकाध्यक्षा संगीता इंगळे व नंदाताई पाचपुते यांनी सांगितले.

यावेळी अंगणवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र बावके, जीवन सुरुडे, जिल्हा उपाध्यक्ष नंदाताई पाचपुते, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष संगीता इंगळे,

कार्याध्यक्ष रजनी क्षीरसागर, उपाध्यक्ष मनीषा माने, अलका बोरुडे, शारदा लोखंडे, छाया भापकर, शोभा थोरात, विजया रंधवे, अनेक अंगणवाडीसेविका व मदतनीस उपस्थित होत्या.