Animal Feed: दूध उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून जनावरांचे आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते व जनावरांचे रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणे हे जनावरांना कोणत्या प्रकारचा आहार दिला जातो यावर प्रामुख्याने अवलंबून असते. जर आपण वेगवेगळ्या ऋतूंचा विचार केला तर ऋतू नुसार जनावरांच्या आहारात बदल करणे देखील तितकेच गरजेचे असते. पावसाळ्यामध्ये आपल्याला माहित आहे की, बऱ्याच ठिकाणी हिरवे गवत उगवते.
या गवतामध्ये जर आपण पाण्याचे प्रमाण पाहिले तर ते 80% च्या पुढे असते. तसेच हे कोवळे लुसलुशीत उगवलेले गवत जर जनावरांनी जास्त प्रमाणात खाल्ले तर त्यांना पोटाचे विकार म्हणजेच अपचन व पोटफुगी सारखा त्रास होण्याचा संभव असतो. या दृष्टिकोनातून देखील खूप लक्ष ठेवणे गरजेचे असते.
पावसाळ्यामध्ये अशा प्रकारची लक्षणे जर जनावरांना दिसून आली तर त्यांना थोडा वाळलेला चारा खाऊ घालणे गरजेचे आहे. तसेच पावसाळ्यामध्ये मोठ्या जनावरांना हिरव्या चाऱ्यासोबत पाच ते सात किलो वाळलेला चारा व शेळी आणि मेंढ्यांकरिता अर्धा ते एक किलो वाळलेला चारा दिला तर त्यांना अपचन होण्याची शक्यता राहत नाही व दुधातील फॅटचे प्रमाण देखील टिकून राहते.
अशाप्रकारे करावे आहार व्यवस्थापन
पावसाळ्यामध्ये जनावरांना हिरव्या गवतामुळे किंवा लुसलुशीत चाऱ्यामुळे होणारा त्रास राहण्यासाठी प्रामुख्याने पावसाचा अंदाज बघून चरण्याच्या वेळांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. ही जर काळजी घेतली तर जनावरांना पचन संस्थेचे व श्वसन संस्थेचे आजार होणार नाहीत. तसेच बऱ्याचदा जनावरांना शरीराचे तापमान टिकून राहावे याकरिता जास्त ऊर्जेची गरज असते.
त्यामुळे पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहारामध्ये शेंगदाणा व सरकी पेंड इत्यादींचा समावेश करणे गरजेचे आहे. यामुळे स्निग्ध पदार्थांचा उत्तम पुरवठा जनावरांना होतो व त्यांची उत्पादन क्षमता देखील टिकून राहते. तसेच जनावरांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहावी व त्यांची प्रजोत्पादन क्षमता वाढावी याकरिता हिरवा व वाळलेला चाऱ्याचे संतुलन ठेवावे व यासोबत संतुलित खुराक देखील जनावरांना आहारात देणे गरजेचे आहे. याकरता तुम्ही अगदी घरी सुद्धा खुराक तयार करू शकतात.
अशाप्रकारे तयार करा घरच्या घरी खुराक
खाद्य मिश्रणामध्ये पेंड किंवा ढेप 25 ते 35 टक्के, बाजरी आणि मक्का 25 ते 35 टक्के, गहू व तांदळाचा कोंडा दहा ते पंचवीस टक्के, डाळीची चूनी पाच ते 20% व वारी इत्यादी मिश्रणातील घटकांचे प्रमाण जनावरांचे आहाराचे आवश्यकता व खाद्यपदार्थांची उपलब्धता यानुसार बदलला आहे. तसेच तयार झालेले या खुराकात एक टक्के खनिज मिश्रणाची पावडर व एक ते दोन टक्के खाण्याचे मीठ देखील मिसळावे. अशाप्रकारे तुम्ही महागडे पशुखाद्य विकत न घेता घरच्या घरी चांगल्या पद्धतीचा खुराक तयार करू शकतात.
पावसाळ्यामध्ये दुधातील फॅट का कमी होतो?
पावसाच्या दिवसांमध्ये सगळीकडे भरपूर प्रमाणात गवत उगवलेले असते व अशा प्रकारचे लुसलुशीत व कोवळे गवत जनावरांनी जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे कमी प्रमाणातील तंतुमय घटक व पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळे दुधातील फॅट घसरतो. त्यामुळे जर पावसाळ्यामध्ये दुधातील फॅट कमी होऊ द्यायचं नसेल तर त्याकरिता कडबा किंवा वैरणचे प्रमाण 28 ते 31 टक्के ठेवणे गरजेचे आहे. तसेच आहारातील एकूण 65 ते 75 टक्के एनडीएफ चाऱ्याच्या माध्यमातून दिले गेले पाहिजे. पुढे जनावरांच्या रूममध्ये तंतुमय जाळे तयार होण्यास मदत होते व जनावरांच्या कोटी पोटातील तंतुमय घटकांचे विघटन होते व दुधातील फॅट मध्ये घसरण न होता ती टिकून राहते.