सेतू चालकांचा मनमानी कारभार; अवाजवी दर आकारात नागरिकांची होतेय आर्थिक लूट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- सर्वसामान्यांची सोय व्हावी, त्यांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, तसेच सेतूमधील दिरंगाईची तक्रार मिटावी या उद्देशाने शासनाने सुरू केलेली महा इ सेवा केंद्रे प्रत्यक्षात नागरिकांची महालूट करणारी ठरत आहेत.

नगर शहरासह जिल्ह्यातील ऑनलाईन सेतू केंद्र, महा ई सेवा केंद्रात विविध दाखले देताना नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम घेणार्‍या सेतू चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटीत कष्टकरी कामगार संघटनेने केली आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, त्यात संघटनेचे अध्यक्ष विलास कराळे यांनी म्हटले आहे की, अहमदनगर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये ऑनलाईन सेवा केंद्र, सेतू केंद्र, महा ई-सेवा केंद्रात सरकारने ज्या दाखल्यासाठी 33.60 पैसे असे रेट ठरवून दिलेले आहेत.

परंतु ते न घेता नागरिकांकडून 200 रुपये घेऊन आर्थिक लूट करत आहेत. या केंद्र चालकांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे त्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

त्यांच्या वेळा निश्चित नसणे ही सार्वत्रिक तक्रार आहे. सेवा दर ठरवून दिले असताना काही केंद्रांमध्ये अधिकचे शुल्क आकारून नागरिकांची लूट केली जाते.

परंतु सरकारी अधिकारी व केंद्रचालक यांचे आर्थिक लागेबांधे असण्याची शक्यता आहे. म्हणून सरकारी अधिकारी सेतू चालकावर कारवाई करत नाहीत. तरी या प्रकरणामध्ये आपण स्वतः लक्ष घालून नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी.