उपोषणकर्त्यांकडे खा.सुजय विखे यांनी पाठ फिरवल्याने कामगारांनी केला निषेध

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथील डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी २५ कोटी ३६ लाख रुपये देणी मिळावे यासाठी सुरू केलेले उपोषण आज दुसऱ्या दिवशी सुरूच होते. खा.सुजय विखे यांनी संचालक मंडळाची बैठक घेऊन युनियन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र विखे यांनी उपोषणाकडे पाठ फिरवल्याने कामगारांनी धिक्कार करून खा. विखेंचा जाहीर निषेध केला.

तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी सोमवारपासून थकीत व इतर देणी मिळवण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता कारखान्याचे सर्वेसर्वा खा. सुजय विखे व संचालक मंडळ यांच्यात विवेकानंद नर्सिंग होम येथे सुमारे २ तास बैठक झाली.या बैठकीत कामगारांच्या देणीवर चर्चा करण्यात आली.

खा. विखे बैठकीतुन बाहेर पडल्यानंतर उपोषण कर्ते कामगारांसमोरून आपल्या वाहनातून ढुंकून न पाहता राहुरीच्या दिशेने निघून गेल्याने संतप्त उपोषण कर्त्यांनी खा.विखे यांच्यासह संचालक मंडळाचा निषेध व्यक्त केला.

यावेळी कामगार नेते इंद्रभान पेरणे म्हणाले की, दुर्देवाची बाब आहे की, उपोषण स्थळापासून अवघ्या 100 मीटरवर खा.विखे यांनी संचालक मंडळ व युनियनची बैठक घेतली. बैठकीनंतर खा.विखे यांनी काढता पाय घेतला.

उपोषणाला आम्ही बसलो आहे, चर्चा मात्र युनियनशी करतात. कामगारांची रक्कम बुडविण्याचा प्रयत्न जर केला तर कायदेशीर फौजदारी करून गुन्हे दाखल करणार असून कारखान्याचा ५ वर्षाचा कारभार जनतेसमोर मांडणार असल्याचे पेरणे यांनी म्हंटले.

दरम्यान दुपारी यूनियचे पदाधिकाऱ्यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली. मात्र यावेळी उपोषण कर्त्यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच झापले. तुम्ही नेमकी मॅनेजमेंटच्या बाजूने की कामगारांच्या ही भूमिका स्पष्ट करा अन्यथा चालते व्हा असा इशारा पेरणे यांनी दिला.