अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  महाराष्ट्रात मागासवर्गीयांवर जातीय अत्याचाराच्या घटना दिवसंदिवस वाढत असून, यावर तातडीने उपाययोजना कराव्या, अन्यथा महाराष्ट्र दलित अन्याय अत्याचारग्रस्त घोषित करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने करण्यात आली.

तसेच बोरगाव माळवाडी येथे मातंग समाजातील मयत व्यक्तीच्या मृतदेहाची जातीय कारणातून विटंबना झालेल्या घटनेचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदविण्यात आला. मागासवर्गीयांवर होणारे जातीय अत्याचार रोखण्यासाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी आरपीआयचे नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, ज्येष्ठ नेते संजय कांबळे, मातंग आघाडी तालुकाध्यक्ष अर्जुन शिंदे,

करण शिंदे, तालुका कार्याध्यक्ष कृपाल भिंगारदिवे, भिंगार शहराध्यक्ष आकाश तांबे, अविनाश उमाप, राहुल शेंडगे, अजित गाडे, आकाश भालेराव आदी उपस्थित होते. महाराष्ट्रात मागासवर्गीयांवर जातीय कारणातून अन्याय अत्याचार होण्याच्या घटना दिवसंदिवस वाढत आहे.

नुकतीच बोरगाव माळवाडी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे मातंग समाजातील मयत व्यक्तीला स्मशान भूमित जाळण्यास विरोध करुन मयताच्या प्रेताची जाणून-बुजून विटंबना करण्यात आली. सदर व्यक्तीचा मृतदेह पंधरा तास अंत्यसंस्काराविना पडून राहिला. स्मशान भूमित अंत्यसंस्कार करुन न दिल्याने शेवटी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मयत व्यक्तीचा अंत्यविधी करण्यात आला.

हा प्रकार जातीय कारणातून घडला आहे. सदर प्रकरणात फिर्याद घेताना जाणीवपूर्वक ठाणे अंमलदार यांनी फिर्यादी विमल साठे यांच्या फिर्यादीत महत्त्वाच्या बाबी समाविष्ट केल्या नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. महाराष्ट्रात मागासवर्गीयांवर जातीय अत्याचाराच्या घटना दिवसंदिवस वाढत असून,

यावर तातडीने उपाययोजना कराव्या, बोरगाव माळवाडी येथील अंत्यविधीला विरोध करणार्‍या जातीयवादी गावगुंडांवर कठोर कारवाई करावी, या प्रकरणातील फिर्यादीची पुरवणी जबाब घेण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.