लाल मिरचीचे भावही विक्रमी पातळीवर पोहचल्याने मसालेही महागणार ! सर्वसामान्यांनी जगायचे कसे ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi news:दररोजच्या स्वयंपाकात भाजी करायची म्हटलं की तिखट लागतेच. गेल्या काही दिवसांत गॅस व खाद्यतेलांची दरवाढ सोसली. आता लाल मिरचीचे भावही विक्रमी पातळीवर पोहचल्याने मसालेही महागणार आहेत.

जीवनावश्यक वस्तू अशा महाग होत राहिल्या तर सर्वसामान्यांनी जगायचे कसे ? अशा प्रतिक्रिया गृहिणींमधून व्यक्त होत आहेत. स्वयंपाकासाठी हमखास लागणाऱ्या लाल मिरचीच्या भावात पुन्हा वाढ झाल्याने परिणामी सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

सध्या मिरचीला उच्चांकी भाव मिळत आहे. सर्वसामान्यांच्या जेवणात महत्त्वाचा घटक असलेल्या मिरचीच्या दरात वाढ झाली. कारण राज्यात पावसामुळे मिरचीवर पडलेल्या रोगामुळे पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादन घटल आहे, त्यामुळे किरकोळ बाजारात मिरची तब्बल ५५० ते ६०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.

महाराष्ट्रात नवीन हिरव्या मिरचीला जास्त भाव मिळत असल्याने लाल मिरची तयार करण्यास शेतकरी उत्सुक नाहीत. कर्नाटकातून दिवाळी मध्ये नवीन मिरची बाजारात दाखल होणे अपेक्षित होते.

मात्र, यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस आणि वादळ झाल्यामुळे एक ते दीड महिना हंगाम लांबला आहे तसेच आंध्रप्रदेश व तेलंगणातील मिरचीचे उत्पादन जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणे अपेक्षित आहे.

मिरचीच्या जुन्या साठ्यातील चांगल्या प्रतीची मिरची संपली आहे तर दुय्यम दर्जाची मिरची कमी प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे मिरचीची भाववाढ झाली असून, डिसेंबरपर्यंत मिरचीचे भाव तेजीत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एकंदरीत पीक व साठ्याची स्थिती लक्षात घेता यंदा काही प्रमाणात भाव कमी होतील. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा दर चढेच राहतीत, असा अंदाज आहे. आंध्रप्रदेशात , सर्वाधिक लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते.

त्यानंतर कर्नाटक व मध्य प्रदेशात घेतले जाते. महाराष्ट्रातील खानदेशात लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. तेलंगणात तिखट तर कर्नाटकात कमी तिखटाच्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. कर्नाटकातून येणाऱ्या मिरचीला ४७ हजार ते ५१ हजार प्रतिक्विंटल भाव मिळत आहे, तर आंध्रप्रदेशातील मिरचीला ३१ ते ३२ हजार रुपये भाव मिळत आहे.