अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- राज्यात श्री गणेशाचे आगमन यंदा 9 सप्टेंबर ला होत आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस असले तरी त्यासाठी मूर्ती घडवण्याचं काम कारखान्यात जवळपास वर्षभर चालतं.

यातच मुर्त्या बनविण्याचे कामं हे अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहे. नेवासा तालुक्यात जवळपास 8 ते 10 हजार जण या मूर्तिकार व्यवसायात आहेत.

यावर्षी करोना काळात डॉक्टर, पोलीस, यांची भूमिका करोना महामारीत महत्वाची ठरली म्हणून यांची एक मुखी असलेल्या मुर्त्या कारागीर मोठया प्रमाणावर बनवत आहेत.

मोठमोठ्या सार्वजनिक मंडळासाठी राज्य शासनाच्या नियमानुसार 1 फुटा पासून तर 4 फुटापर्यत श्रीं च्या आकर्षक मुर्त्या बनवण्याचें काम सुरू आहे. आता सर्व मूर्तींवर शेवटचा हात हे कारागीर फिरवत आहेत.

यावर्षी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर श्री गणेशाच्या मूर्ती तयार होत आहेत. यंदा सर्वत्र शाडूच्या मूर्ती तयार करण्यावर कारागीर भर देत आहेत.

लहान मूर्ती शाडूपासून बनवल्या जात आहेत तर मोठ्या मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवल्या जात आहेत. पण करोनामुळे या व्यवसायाला यंदा खीळ बसली.

कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झालेली आहे. बहुतेक कारखानदार कर्ज काढून तो पैसा दरवर्षी व्यवसायात ओततात. यंदा देखील अशा संकटांत मूर्ती विक्री झाली नाही तर कारखान दारांची पूर्ण गळचेपी होईल हे नक्की.