अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- राहुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा सुरू असलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे. त्यामुळे राहुरी शहर आणि परिसर आगामी काळात राज्यात विकासाच्या बाबतीत अग्रेसर असेल असे कौतुकोद्गार राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्‍पादन, क्रीडा व युवक कल्‍याण, राजशिष्‍टाचार, माहिती व जनसंपर्क, विधि व न्‍याय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे आणि सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी काढले.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान अंतर्गत राहुरी नगरपरिषदेच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ आज राज्यमंत्री कु. आदिती तटकरे आणि आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री डॉ. कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, नगराध्यक्ष अनिल कासार, माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, हर्ष तनपुरे आदींसह नगरपालिका पदाधिकारी, नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, राहुरी शहराच्या विकासासाठी महत्वाच्या असलेल्या या सुमारे २६ कोटी रुपये खर्चाच्या आणि ९ लाख लीटर क्षमतेच्या पाणीपुरवठा योजनेचे आज भूमिपूजन होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करताना नागरिकांसाठी पाणी ही महत्वाची गरज असते आणि त्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा असतो हे मी अनुभवले आहे.

त्यामुळेच नगरविकास विभागाचे राज्यमंत्रीपद सांभाळताना श्री. तनपुरे यांनी राहुरी शहरासाठी ही योजना प्राधान्याने मंजूर करून घेतली हे उल्लेखनीय आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करून त्यांनी संवेदनशीलता जपली आहे, असा आवर्जून उल्लेख त्यांनी केला राज्य शासनात राज्यमंत्री म्हणून काम करताना ज्या विभागांची जबाबदारी दिली आहे, ती पार पाडण्याचा आणि सहकाऱ्यांना विकास कामासाठी शक्य ती सर्व मदत करण्याचा आपला प्रयत्न असतो, असे त्या म्हणाल्या.

राज्यमंत्री कदम म्हणाले, जुन्या नेत्यांचा आदर्श, वारसा आणि नव्या कलापणाची सांगड घालून आम्ही सर्व तरुण सहकारी काम करीत आहोत. त्यामध्ये राज्यमंत्री श्री. तटकरे यांचा विकासकामांसाठी असलेला पाठपुरावा सगळ्यांनी पाहिला आहे. राहुरी शहर आणि मतदारसंघासाठी सातत्याने विकास योजना आणण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न असतो.

सर्वांना सोबत घेऊन जाणारे हे नेतृत्व आहे, असे त्यांनी नमूद केले. सध्या या मतदारसंघासाठी कृषी, सहकार आदी विभागातील योजनाच्या अंमलबजावणीसाठी निश्चित सहकार्य करू, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राज्यमंत्री श्री. तनपुरे म्हणाले, राहुरी शहराच्या विकासासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. शहरातील नागरिकांना वेळेवर दैनंदिन स्वरूपात पाणीपुरवठा होईल यासाठी ही पाणीयोजना उपयुक्त ठरणार आहे.

पुढील २५-३० वर्षाची राहुरी शहराची लोकसंख्या गृहीत धरून त्यांना आवश्यक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या योजनेच्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राहुरी शहरात भूमिगत गटार, जॉगीग ट्रॅक, चौकांचे सुशोभीकरण आदी कामे सुरू असून राहुरी बस स्थानकाच्या नवीन कामास लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

याशिवाय तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असणाऱ्या वांबोरी गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचेही ते म्हणाले. पुढील दोन वर्षात शहर पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. आमदार श्री. पवार म्हणाले, कोरोना मुळे आर्थिक संकट असतानाही नागरिकांच्या प्राधान्य असलेल्या योजनांसाठी राज्य शासन मदत करीत आहे.

राज्यमंत्री तनपुरे यांच्या रूपाने मतदारसंघाला संवेदनशील नेतृत्व मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकत नगराध्यक्ष अनिल कासार शहर पाणीपुरवठा योजनेची आणि विविध विकास कामांची माहिती दिली. यावेळी कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या विविध क्षेत्रातील कोरोना योध्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.