Maharashtra Politics : आमदार रोहित पवारांची उद्योगमंत्र्यांकडून मोठी फसवणूक ! म्हणाले सावत्रभावाची’ वागणूक…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Politics :  उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कर्जत जामखेड एमआयडीसीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार तब्बल साडेचार तास’ ताटकळत राहिल्याचा प्रकार मंगळवारी घडला. मात्र, यानंतरही उद्योगमंत्र्यांना चर्चेसाठी वेळ न मिळाल्याने बैठक रद्द करण्यात आली.

सध्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील प्रस्तावित एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. सोमवारी याच मुद्द्यावर आमदार पवार यांनी विधानभवनासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भर पावसात आंदोलन केले होते. या वेळी त्यांनी आपल्या कर्जत जामखेड या मतदारसंघात मंजूर झालेली एमआयडीसी या सरकारने रोखल्याचा आरोप केला होता.

या आंदोलनानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार पवार यांची भेट घेऊन, या एमआयडीसीसंदर्भात बैठक घेऊन अधिसूचना काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंत्री सामंत यांनी मंगळवारी दुपारी २.३० वाजता विधानसभा अध्यक्षांच्या बाजूच्या दालनात बैठक बोलावली होती.

ठरल्याप्रमाणे आमदार पवार हे या बैठकीसाठी वेळेवर हजर होते. तसेच एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अहमदनगरचे जिल्हाधिकारीदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर होते; परंतु उद्योगमंत्री उदय सामंत हे सभागृहातील कामकाजामुळे या बैठकीसाठी वेळेवर उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांच्याकडून अर्ध्या तासात बैठकीला उपस्थित राहतो, असा निरोप देण्यात आला होता.

परंतु तब्बल चार तास गेले तरी उद्योगमंत्री या बैठकीला उपस्थित राहिले नव्हते. दरम्यान, रोहित पवार हे आपली जागा न सोडता तब्बल साडेचार तास उद्योगमंत्र्यांची वाट पाहत थांबले होते. अखेर ही बैठक रद्द झाल्याचा निरोप मंत्र्यांकडून देण्यात आला. परंतु आपल्या मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नासाठी रोहित पवार यांची धडपड व त्यांनी दाखवलेला संयम पाहून या वेळी उपस्थित अधिकारीही चकित झाले होते.

उद्योगमंत्र्यांकडून माझी फसवणूक !

माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीची अधिसूचना काढण्याबाबत मंगळवारी दुपारी २.३० वाजता बैठक घेण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्यामुळे सोमवारी उपोषण मागे घेतले. त्यानुसार मी आणि सर्व अधिकाऱ्यांनी तब्बल साडेचार तास वाट पाहूनही उद्योगमंत्री बैठकीला आले नाहीत. त्यामुळे माझी तर फसवणूक झालीच; पण माझ्या मतदारसंघाचीही फसवणूक करून संपूर्ण राज्यातील युवांविषयीचा -दृष्टिकोन या सरकारने आपल्या कृतीतून दाखवून दिला.

विरोधकांना ‘सावत्रभावाची’ वागणूक देण्याचा हा अत्यंत निंदणीय प्रकार आहे. तरीही माझी सरकारला पुन्हा एकदा • विनंती आहे की, एमआयडीसीची अधिसूचना तातडीने काढून माझ्या मतदारसंघातील युवांना न्याय द्या, अन्यथा माझ्या मतदारसंघातील युवांच्या आणि नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता, याच अधिवेशनात पुन्हा तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.