भाजप नेते केवळ राजकारणासाठी चांगल्या गोष्टींकडं दुर्लक्ष करतात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- राज्य अडचणीत असताना ‘सीएम फंडा’ऐवजी ‘पीएम केअर’ ला निधी देण्याचे आवाहन करणारे विरोधी पक्ष नेते केंद्राकडून राज्याला मदत मिळण्यासाठी पत्र लिहून पाठपुरावा करण्याचे धारिष्ठ दाखविताना दिसत नाहीत, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान फडणवीस यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना एक पत्र पाठविले. त्यामध्ये राज्यातील आघाडीचे सरकार राज्यातील करोना परिस्थिती हातळण्यास अपयशी ठरत असल्याकडे पत्रातून लक्ष वेधण्यात आले आहे.

या पत्राला सत्ताधारी आघाडीच्या काही नेत्यांनी उत्तरे दिली आहेत. आता आमदार रोहित पवार यांनीही फडणवीस यांच्या या कृतीला सडेतोड उत्तर दिले आहे. याप्रकरणी पवार म्हणाले, ‘राज्य सरकार, आरोग्य आणि इतर यंत्रणा कसं काम करतायेत हे मी जवळून पाहत आहे.

त्यांच्या या कष्टावर राजकीय हेतूने कोणी पाणी फिरवत असेल तर ते योग्य नाही म्हणून आणि वस्तुस्थिती पुढं यावी म्हणून मी हे बोलत आहे. कोणावर टीका करणं हाही माझा हेतू नाही.

राज्यातील विरोधक राज्य सरकारवर टीका करत असताना खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाय योजनांची जाहीर प्रशंसा केली.

सुप्रीम कोर्टानेही महाराष्ट्राच्या मॅनेजमेंट व ऑक्सिजन पुरवठ्याची स्तुती केली. जागतिक अर्थतज्ञ आणि ‘आरबीआय’चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही महाराष्ट्र सरकारचं कौतुक करत महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन बेड तरी पुरवू शकलं, पण इतर राज्यांना तेही करता आलं नाही, असं म्हटलं आहे.

मात्र तरीही राज्यातील भाजपचे नेते केवळ राजकारणासाठी या सगळ्या चांगल्या गोष्टींकडं दुर्लक्ष करत आहेत, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.