विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता गल्लीपासून ते मुंबई पर्यंतचे राजकारण तापायला सुरुवात झाली असून वेगवेगळ्या पक्षांनी आता अनेक प्रकारच्या प्लॅनिंग करून नेतेच नाही तर पक्षांच्या खालच्या फळीतले महत्त्वाचे कार्यकर्ते देखील आपापल्याकडे खेचण्याचे काम सुरू केले असून खालच्या फळीपर्यंत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक पक्ष यामध्ये आपल्याला प्रयत्न करताना दिसून येत आहे.
याच प्रकारचा प्रयत्न हा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात म्हणजे सध्याचे विद्यमान आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात भाजपने केला व या ठिकाणी कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष संजय काशीद आपल्या गळ्याला लावण्यात यशस्वी झाले
व त्यांचा नुकताच मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळे हा पक्षप्रवेश आमदार रोहित पवारांना एक धक्का मानला जात असून यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलतील अशी देखील शक्यता राजकीय तज्ञांकडून वर्तवली जात आहे.
आ.रोहित पवारांना धक्का?
कर्जत-जामखेड विधानसभाप्रमुख प्रा. मधुकर राळेभात व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष संजय काशीद यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला.
नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. प्रा. राम शिंदे, आ. सुरेश धस, आ. आतुल भातकळर आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.प्रा. मधुकर राळेभात हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख म्हणून पदावर होते.
त्यांच्यासह उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष संजय काशीद, जामखेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मोहन पवार, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, खर्डा ग्रामपंचायत सदस्य महालींग कोरे, माजी सरपंच हरिभाऊ खवळे, भगवान देवकाते, शिवसेनेचे जामखेड शहरप्रमुख सुरज काळे यांच्यासह त्यांच्या कार्यकत्यांनी भाजपात प्रवेश केल्याने हा आ. रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जातो.
यावेळी बोलताना राळेभात म्हणाले, शिवसेनेत अनेक वर्षे राहिलेलो असल्याने भारतीय जनता पक्षासोबत जुना ऋणानुबंध होताच. विधानसभा अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती.
त्यानंतर काही कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी आ. रोहित पवार यांनी आम्हाला कुकडीचे पाणी देऊ, मतदारसंघाची बारामती करू, अशी आश्वासने दिलीहोती. परंतु पवार यांच्याकडून घोर निराशा झाल्याने हा निर्णय घेत आहे.
त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही. कुणाच्याही हाताला काम दिले जात नाही, मानसन्मान दिला जात नाही. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कामाची पद्धत माहित आहे. त्यांच्याशी संबंधही चांगले असल्याने हा प्रवेश केल्याचेही राळेभात म्हणाले.