काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व राज्यातील सुसंस्कृत लोकप्रिय चेहरा म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांची ओळख असून उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मुंबई सह विविध भागातून त्यांना सभेसाठी मोठी मागणी असून आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्यभर प्रचाराचा झंझावात सुरू ठेवला असून संगमनेर तालुक्याची जबाबदारी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सांभाळली आहे.
आमदार बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे प्रमुख नेते असून महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांसह मित्र पक्षांशी त्यांनी समन्वय ठेवला आहे. सर्व पक्षांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि सातत्यपूर्ण केलेल्या कामामुळे जनसामान्यांमध्ये त्यांचा मोठा आदर आहे. मागील तीन दिवसांमध्ये त्यांनी राज्यभर प्रचाराचा धडाका सुरू ठेवला असून काँग्रेस पक्षाने प्रचारासाठी त्यांना हेलिकॉप्टर दिले आहे.
दोन दिवसांमध्ये मुंबई, धुळे, अंमळनेर ,रावेर , कोल्हार,शिर्डी, यांसह पुणे, हडपसर, अहमदनगर, जुन्नर या मतदारसंघांमधून त्यांनी जोरदार सभा घेतल्या आहेत. या सर्व सभांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
मुंबई येथील बीकेसी मैदानावर झालेल्या महाविकास आघाडीच्या भव्य मेळाव्यातून प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले.महिलांना तीन हजार रुपये महिना व शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी हा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे महाविकास आघाडीने जाहीर केले असून राज्यांमध्ये मोठी परिवर्तनाची लाट निर्माण झाली असल्याचे आमदार थोरात यांनी म्हटले असून महाविकास आघाडी 200 च्या आसपास जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यभर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत असताना संगमनेर तालुक्याच्या प्रचाराची जबाबदारी ही मा. आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे ,सौ दुर्गाताई तांबे, व युवक नेत्या डॉ जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आणि जनतेने घेतली आहे.
युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून डॉ. जयश्रीताई थोरात यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढला असून तरुणांची मोठी उपस्थिती हे या संवाद यात्रेचे वैशिष्ट्य ठरले आहे .संगमनेर तालुक्यामध्ये ही निवडणूक महोत्सव म्हणून साजरी होत आहे आमदार थोरात हे राज्यभर किल्ला लढत असताना संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ता मात्र तालुक्याचा स्वाभिमान आणि अस्मिता जपत आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मोठ्या मताधिक्यासाठी एकवटला आहे.