अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- राज्य परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त होऊन मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी आजी-माजी कर्मचार्‍यांच्या माध्यमातून पारनेर आगारात कायम स्वरुपी विश्रांती व भोजन कक्ष उभारले. या विश्रांती व भोजन कक्षाचा शुभारंभ राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभिम कुबडे यांच्या हस्ते झाला.

यावेळी वसंत चेडे, संजय वाघमारे, चंदु चेडे, शेटे महाराज, विजय औटी, अर्जुन भालेकर, ज्ञानेश्‍वर सातपुते, आगार व्यवस्थापक भोपळे, करपे, कांबळे आदिंसह आजी-माजी कामगार उपस्थीत होते.

सेवानिवृत्त होऊन मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी राज्य परिवहन महामंडळाची जाणीव ठेऊन आपल्या मयत व्यक्तीच्या स्मरणार्थ रोख रक्कम, बाकडे देऊन विश्रांती व भोजन कक्ष उभारले आहे. माजी कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे.

ज्या घटकातून आपण वाढलो त्याबद्दल कृतज्ञता भाव ठेऊन केलेली मदत सत्कर्मी लागली आहे. पारनेर आगाराचा आदर्श ठेऊन इतर आगारात देखील हा उपक्रम राबविण्याचे आवाहन राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभिम कुबडे यांनी केले.