प्रेताची विटंबना करणार्‍या जातीयवादी गावगुंडावर कठोर कारवाई करण्याची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्हा मातंग समाज पंच कमिटीच्या वतीने बोरगाव माळवाडी येथे मातंग समाजातील मयत व्यक्तीच्या मृतदेहाची जातीय कारणातून विटंबना झालेल्या घटनेचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदविण्यात आला.

तर या घटनेतील जातीयवादी गावगुंडावर कठोर कारवाई करावी व आरोपींना पाठिशी घालणार्‍या संबंधीत पोलिस अधिकार्‍यांवर देखील कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी पंच कमिटीचे अध्यक्ष साहेबराव पाचारणे, युवा अध्यक्ष उमेश साठे, कार्याध्यक्ष मधुकरराव पठारे, प्रा. बाबासाहेब शेलार, प्रा. ना.म. साठे, बाबासाहेब साठे, देवराम साठे, रंजीत पारधे, मनिष साठे आदी उपस्थित होते.

बोरगाव माळवाडी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे मातंग समाजातील मयत व्यक्तीला स्मशान भूमित जाळण्यास विरोध करुन मयताच्या प्रेताची जाणून-बुजून विटंबना करण्यात आली. सदर व्यक्तीचा मृतदेह पंधरा तास अंत्यसंस्काराविना पडून राहिला. या घटनेने भारतीय संविधानाच्या मुलभुत हक्काचे उल्लंघन झाले आहे.

स्मशान भूमित अंत्यसंस्कार करुन न दिल्याने शेवटी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मयत व्यक्तीचा अंत्यविधी करण्यात आला. गावगुंडाची जातीयवादी कृती व पोलिस प्रशासनाच्या हेकेखोर कृतीमुळे हा चुकीचा प्रकार घडला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. संपुर्ण महाराष्ट्रात या घटनेचा निषेध नोंदविला जात आहे.

शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर व अण्णाभाऊंच्या समतावादी महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी शासनाने वेळीच दखल घेऊन यामधील आरोपींवर कठोर कारवाई करुन संबंधीत पोलिसांवर देखील कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले.