राज्यात लोकशाही बंद झालेली असून हुकूमशाही सुरू आहे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- केंद्राचे अधिवेशन जर २५ दिवस चालू शकते तर राज्यातील अधिवेशन दोनच दिवस का घेतले गेले. यावरून महाराष्ट्रात लोकशाही बंद झालेली असून हुकूमशाही सुरू आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली.

मंत्री डॉ. नितीन राऊत हे दिल्लीत जाऊन दलित समाजाच्या मुलीवर झालेल्या हत्येबाबत आंदोलन करतात. दिल्लीतील घटना गंभीर आहेच. पण, महाराष्ट्रात विशेषत: दलित समाजावर काही महिन्यांत शेकडो अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. परंतु त्यावर नितीन राऊत प्रतिक्रिया देत नाहीत याचे आश्चर्य वाटते.

दिल्लीत जाऊन आंदोलन करण्यापेक्षा महाराष्ट्रातील घटनांवर त्यांनी मौन सोडायला हवे. महाराष्ट्रातील घटनांवर बोलायचे नाही, हा ढोंगीपणा योग्य नाही असा टोला फडणवीसांनी लगावला. केंद्र सरकारने १२७ वी घटना दुरुस्ती करून कुठल्याही समाजाला मागास ठरविण्याचा अधिकार राज्यांना दिला आहे.

त्यामुळे पुन्हा राज्य शासनाने केंद्राकडे बोट दाखवू नये. आधी केंद्राकडे मदत मागायची मदत दिल्यावर त्यात अडथळे आणायचे असे राजकारण सध्या राज्य शासनाचे सुरू आहे, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षण आम्ही दिले, ते उच्च न्यायालयात टिकले आणि सर्वोच्च न्यायालयात राज्यांच्या अधिकारक्षेत्रावरून संभ्रम झाला.

केंद्र सरकारने तत्काळ राज्यांना अधिकार देत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे झालेला संभ्रम दूर केला आहे. पण, महाविकास आघाडी केवळ राजकारण करते आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार गंभीर नाही आणि वेळकाढूपणा करत असल्याची टीका फडणवीसांनी केली.