अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-प्रलंबित समस्या, अडचणी, प्रश्न मांडण्यासाठी नागरिकांचे हक्काचे व्यासपीठ असलेली ग्रामसभा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून होऊ शकल्या नाहीत.

यातच टाकळीभान ग्रामपंचायतीने मंगळवार रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेलाही पावसाने स्थगिती दिली. दरम्यान टाकळीभान ग्रामपंचायतीच्या वतीने गेल्या दीड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर करोनाचे नियम पाळून 31 ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेतला होता.

गेल्या सात महिन्यांपूर्वी सत्तेत आल्यानंतर केलेल्या विकास कामांना मंजुरी, पुढील कालावधीसाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याला मंजुरी,

विठ्ठल देवस्थान विश्वस्त मंडळ व देवस्थान जमिनीवरील कथीत कूळ याबाबत चर्चा, तसेच तंटामुक्त गाव अभियानात सहभाग घेण्यासाठी चर्चा व इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

बर्‍याच मोठ्या कालखंडानंतर ग्रामसभा होणार असल्याने अनेकांना याची उत्सुकता होती. तसेच गेल्या आठ दिवसांपासून ग्रामसभेसाठी विविध प्रश्नांची रंगीत तालीम करीत असलेल्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. आता परत कधी सभा आयोजित होणार यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे.