अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या संकटकाळात पत्रकार बांधवांच्या संपर्कात राहून माहिती कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या सूचना व विविध माहिती वेळोवेळी जनते पर्यंत पोहचविण्यात आली. येथील वृत्तपत्र व माध्यमांनी देखील वास्तुनिष्ठ बातम्या नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे महत्त्वाचे कार्य केले.

यामुळे जिल्ह्यात कधीही वादाचे प्रसंग उद्भवले नाही. कार्य करताना अधिकारी, पत्रकार बांधव व कर्मचारी यांची मोलाची साथ लाभली असल्याची भावना नुकतीच बदली झालेले जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी व्यक्त केली. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांची मुंबई येथे मंत्रालयात बदली झाली असता त्यांचा मराठी पत्रकार परिषदच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, साहेबराव कोकणे, रोहित सोनवणे, प्रदिप पेंढारे, केदार भोपे, संदीप कुलकर्णी, आफताब शेख, बाबा ढाकणे,प्रियंका धारवाले, ऋतूजा नडोणे आदिंसह पत्रकार, वृत्तछायाचित्रकार व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, सव्वाचार वर्ष अहमदनगर जिल्ह्यात काम करताना चांगला अनुभव मिळाला.

सर्व पत्रकार, संपादक व माध्यमांच्या प्रतिनिधींनी सहकार्याची भावना ठेवली. सकारात्मक राहिल्याने त्याचे परिणाम सकारात्मक मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात मन्सूर शेख यांनी शासन व पत्रकार यांमधील दुवा बनण्याचे काम जिल्हा माहिती अधिकारी चव्हाण यांनी केले.

कोरोना काळाच्या गंभीर परिस्थितीमध्ये देखील त्यांनी उत्तमपणे काम करुन शासनाच्या मार्गदर्शक सूचना व माहिती वेळोवेळी वृत्तपत्र व प्रसार माध्यमांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले. पत्रकारांमध्ये एक सदस्य म्हणून वावरताना त्यांनी सर्वांबरोबर मैत्रीपुर्ण नाते जपल्याचे त्यांनी सांगितले.

उपस्थितांनी चव्हाण यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका धारवाले यांनी केले. आभार आफताब शेख यांनी मानले.