अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- इतरत्र पावसाचे थैमान सुरू असताना सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आणि गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोटात मात्र रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसाने धरणांच्या साठ्यात वाढ होणे अवघड आहे.

दमदार पाऊस नसल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यभरात सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी ढगफुटीची प्रचिती आली.

नद्या, नाल्यांना पुर आला. परंतु नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या परिसरातील पाऊस रिमझिम सुरु होता. दरम्यान गंगापूर धरणाच्या भिंतीजवळ 9, कश्यपी 2, गौतमीला 2, त्र्यंबकला 2 तर अंबोलीला 5 मिमी पावसाची नोंद झाली.

या धरणांमध्ये कोणत्याही प्रकारचे नवीन पाणी दाखल झाले नाही. गंगापूर धरणाचा साठा 91.01 टक्क्यांवर स्थिर आहे. 5630 दलघफू क्षमतेच्या या धरणात 5124 दलघफू साठा आहे.

कश्यपी 66.36 टक्के, गौतमी गोदावरी 72.91 टक्के. दारणात 90.49 टक्के पाणी साठा आहे. भावली 100 टक्के भरले असल्याने या धराणतून 135 क्युसेक ने विसर्ग सुरु आहे.

मुकणे 58.17 टक्के, भाम 100 टक्के भरले असल्याने त्यातून 150 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. वालदेवी 100 टक्के भरले असल्याने या धरणातून 65 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. आळंदी 100 टक्के भरले आहे यातून 30 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.